मुंबई मध्ये आज सकाळी अटल सेतू (Atal Setu) वर एकाने आत्महत्या केल्याचं वृत्त ताजं असताना आता गोरेगाव मेट्रो स्थानकातून रस्त्यावर उडी मारत आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गोरेगाव पश्चिम मेट्रो स्थानकातील (Goregaon West Metro Station) आहे. आज 30 सप्टेंबरच्या संध्याकाळची साडेतीनच्या सुमाराची ही घटना आहे. दरम्यान घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, या 22 वर्षीय तरूणाचा आत्महत्येपूर्वी आपल्या मैत्रिणीसोबत वाद झाला होता. सध्या बांगूर नगर पोलिसांनी या घटनेची नोंद करून घेतली आहे. मुंबई मध्ये मेट्रो स्थानकातून आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे. नक्की वाचा: Atal Setu Suicide Case: अटल सेतू वर अजून एक आत्महत्या; 40 वर्षीय व्यक्तीने समुद्रात उडी मारून संपवलं आयुष्य .
सिद्धांत मुंबई मध्ये आपल्या पालकांसोबत राहत होता. आज संध्याकाळी गोरेगाव वेस्ट मेट्रो स्टेशन मध्ये प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून उडी मारत त्याने आत्महत्या केली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, तो मैत्रिणीसोबत प्लॅटफॉर्म नंबर 1 वर उभा होता. तेथूनच त्याने खाली उडी मारली. या घटनेनंतर त्याच्या मैत्रिणीला मेट्रो स्थानकातील कर्मचार्यांनी रोखून ठेवले.
महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये सिद्धांत आई-बाबांसोबत गोरेगावच्या भगत सिंग नगर मध्ये राहत होता. तर आज संध्याकाळी तो आला. तिकीट घेऊन फलाटावर आल्यानंतर रुळापासून दूर असलेल्या ग्रीलजवळ गेला. ग्रीलवरुन खाली उडी मारल्याने रस्त्यावर पडून त्याचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी त्याला नजिकच्या ऑस्कर हॉस्पिटल मध्ये नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांकडून तरूणाने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास करत आहे. स्टेशन मधील सीसीटीव्ही फूटेज मध्ये तरूण निराश असल्याचं दिसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.