![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/07/Bmc-Mayor-Vishwanath-Mahadeshwar-380x214.jpg)
आज (11 जुलै) गोरेगाव (Goregaon) येथे 3 वर्षीय मुलगा नाल्यात पडल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी स्थानिकांनी रास्तारोके आंदोलन केले. तर महापालिकेला (BMC) जबाबदार पकडत धारेवर धरले आहे. मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली. मात्र त्यावेळी महाडेश्वर यांच्यावर नागरिक संतप्त झालेले दिसून आले. परंतु अशा प्रकारासाठी महाडेश्वरांनी उलटा आरोप करत मुंबईकरच गटारांची झाकणे उघडी ठेवतात असे स्पष्टीकरण दिले आहे.
दिव्यांश सिंह नावाचा अल्पवयीन मुलगा नाल्यात पडून वाहून गेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. तसेच नागरिकांनी महापालिकेला या दुर्घटनेसाठी जबाबदार ठरवले आहे. परंतु महापालिकेच्या महापौरांनी या घटनेचे खापर 'सिव्हिक सेन्स' वर फोडले आहे. त्याचसोबत दिव्यांशच्या आईने त्याची काळजी घ्यायला हवी होती. तसेच गटाराच झाकट का उघडे ठेवले होते की झाकट नागरिकांनी तोडले होते याची चौकशी करावी असे आदेश महाडेश्वर यांनी दिले आहेत.
त्याचसोबत महाडेश्वर यांनी असे म्हटले की, स्थानिक काही वेळेस कचरा टाकण्यासाठी गटारांची झाकणे उघडी ठेवतात. तसेच गटारांच्या झाकणांची नागरिकांकडून तोडफोड केली जात असे आरोप त्यांनी लगावले आहे. पालिकेकडून नागरिकांना याबद्दल वारंवार सांगितले जाते तरीही त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जाते असे सुद्धा महाडेश्वर यांनी म्हटले आहे.