मालगाडीचे डबे रुळावरुन घसरण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना देशामध्ये घडल्या आहेत. पहिली घटना महाराष्ट्रात घडली (Goods Train Coaches Derailed in Maharashtra). तर दुसरी घटना तामिळनाडू (Goods Train Coaches Derailed in Tamil Nadu) राज्यात घडली. ठाणे जिल्ह्यातील कसारा स्टेशन आणि TGR-3 डाऊन मेन लाईनच्या सेक्शन दरम्यान ही घटना रविवारी सायंकाळी 6:31 च्या सुमारास घडली. सात डबे रुळावरुन घसरल्याने रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली. दुसऱ्या घटनेत तामिळनाडूतील चेंगलपट्टूजवळ रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास मालगाडीचे जवपळास सात डबे रुळावरुन घसरले.
एक्स्प्रेसच्या वाहतुकीवर परिणाम
मध्य रेल्वेने माहिती देताना म्हटले की, कसारा ते इगतपुरी डाउन लाईन सेक्शनमधील मेल एक्स्प्रेसच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून, डाउन मेन लाईन आणि मिडल लाईनवर परिणाम झाला आहे. मात्र, इगतपुरी ते कसारा दरम्यानच्या अप मार्गावर कोणताही परिणाम झालेला नाही. सुदैवाने उपनगरीय लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे 122261 मुंबई सीएसएमटी-हावडा एक्सप्रेस आणि 11401 सीएसएमटी-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस या दोन गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी कल्याण स्टेशन रोड एआरटी (अपघात मदत ट्रेन) आणि इगतपुरी स्टेशन रेल्वे एआरटीसह अपघात मदत गाड्या तैनात केल्या आहेत. रुळ साफ करण्यासाठी आणि प्रभावित रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी रात्री उशीर पर्यंत प्रयत्न सुरु होते. (हेही वाचा, Goods Train Derailed: कसाराजवळ मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले, मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतुक ठप्प)
ट्रेनचे 5 हून अधिक डबे रुळावरून घसरले
दरम्यान, तामिळनाडू राज्यात लोखंडी रॉड आणि इतर अवजड साहित्य घेऊन चेन्नई हार्बरकडे जाणाऱ्या मालकाडीचे डबे रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास रुळावरुन घसरले. प्राप्त माहितीनुसार, ट्रेनचे 5 हून अधिक डबे रुळावरून घसरले. ज्यामुळे दक्षिण तामिळनाडूहून चेन्नईकडे जाणाऱ्या प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे अधिकारी ट्रॅक साफ करण्यासाठी आणि ट्रेनच्या हालचालींचे नियमन करण्यासाठी काम करत आहेत, अशी माहिती चेंगलपट्टू रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच, डबे रुळावरून घसरण्याच्या कारणाचा तपास केला जाईल.
व्हिडिओ
#WATCH | Tamil Nadu: Goods train coming towards Chennai Harbour carrying iron-related rods derailed near Chengalpattu last night around 10.30 pm. More than 5 coaches of the train derailed. The movement of passenger trains from South Tamil Nadu towards Chennai has been affected.… pic.twitter.com/oyY8t7Gp0P
— ANI (@ANI) December 11, 2023
अधिक माहिती अशी की, 38 डबे असलेली ही ट्रेन लोखंडी धातू, धातूचे पत्रे आणि लोखंडी रॉडने भरलेली होती. चेंगलपट्टू येथून निघालेल्या या प्रवासादरम्यान 38 पैकी आठ डबे रुळावरून घसरले. या घटनेत रेल्वे रुळांचे नुकसान झाले कारण धातूचे सामान रुळावरून घसरले. चेंगलपट्टू आणि विल्लुपुरम येथील जलद प्रतिसाद पथके इतर रेल्वे सेवांसाठी कमीत कमी विलंब सुनिश्चित करण्यासाठी त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. या आधीही ऑक्टोबरच्या सुरुवातीला, चेन्नईतील उपनगरी आवाडीजवळ इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (EMU) चे चार रिकामे डबे रुळावरून घसरले होते.