New India Co-operative Bank (फोटो सौजन्य - ट्विटर)

New India Cooperative Bank Scam: रिझर्व्ह बँकेने संकटात सापडलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँके (New India Cooperative Bank) च्या ठेवीदारांना 27 फेब्रुवारीपासून 25 हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी 13 फेब्रुवारी रोजी, मध्यवर्ती बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर सर्व समावेशक निर्देश (एआयडी) लागू केले होते. तसेच बँकेला बचत बँक किंवा चालू खात्यातून किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी न देण्याचे निर्देश देण्यात आले होते.

दरम्यान, आता रिझर्व्ह बँकेने प्रशासकाशी सल्लामसलत करून बँकेच्या रोखतेच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर, 27 फेब्रुवारी 2025 पासून प्रत्येक ठेवीदाराला 25 हजार रुपयांपर्यंत ठेव काढण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. वरील सवलतींसह एकूण ठेवीदारांपैकी 50 टक्क्यांहून अधिक ठेवीदार त्यांचे संपूर्ण शिल्लक काढू शकतील आणि उर्वरित ठेवीदार त्यांच्या ठेवी खात्यांमधून 25 हजार रुपयांपर्यंत पैसे काढू शकतील. (हेही वाचा - New India Co-operative Bank Scam: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात सरकार ठेव विम्याची मर्यादा 5 लाख रुपयांपेक्षा जास्त वाढवण्याची शक्यता)

ठेवीदार हे पैसे काढण्यासाठी बँकेच्या शाखेचा तसेच एटीएमचा वापर करू शकतात. तथापि, काढता येणारी एकूण रक्कम प्रति ठेवीदार 25 हजार रुपये किंवा त्यांच्या खात्यात उपलब्ध असलेली शिल्लक यापैकी जी कमी असेल ती असेल, असे आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे. (New India Co-operative Bank Row: EOW कडून GM Hitesh Mehta ला अटक; 122 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप)

बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता यांच्यावर बँकेच्या तिजोरीतून 122 कोटी रुपयांची रोख रक्कम गैरवापर केल्याचा आरोप आहे. आरबीआयने बँकेला नवीन कर्ज देण्यास आणि ठेवी काढण्यास स्थगिती दिली होती. त्यानंतर हितेश मेहता यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील एका अधिकाऱ्याने हितेश यांच्यावर पैसे लाटल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेने हितेश यांनी अटक केली होती.