शिवाशाही बस (Shivshahi Bus Accident) उलटल्याने 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील खजरी (Arjuni Khajari) गावाजवळ शुक्रवारी (29 नोव्हेंबर) दुपारी एकच्या सुमारास घडला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बसमधून 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना घडली तेव्हा बसमधून किती जण प्रवास करत होते. याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, जखमींना जवळच्या साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणि गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत
शिवशाही बस उलटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात घडला तेव्हा बस पूर्ण क्षमतेने भरली होती. अपघातामध्ये बस जवळपास 50 फुटांबर्यंत जमीनीसोबत घासत गेली. ज्यामुळे बसमधील आठ जण मृत्यूमुखी पडले तर 15 ते 17 जण जखमी झाले. अपघाताची तीव्रता अधिक असल्याने मृतांची संख्या वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताची दखल घेतली असून, प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना नुसानभरपाई म्हणून तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. (हेही वाचा, व्हिडिओ: शिवशाही बस जागेवरच पेटली, आलीशान गाडी जळून खाक)
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडून अपघाताची दखल
राज्यात सध्या सरकार अस्तित्वात नाही. विधानसभा निवडणूका पार पडल्याने आगोदरच्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व खात्यांचा कारभार मुख्यमंत्र्याकडे एकवटला आहे. अशा स्थितीत राज्य परीवहन मंत्रालयाची जबाबदारीसुद्धा शिंदे यांच्याकडेच आहे. ती पाहता त्यांनी शिवशाही बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांस तातडीची मदत द्यावी, संबंधीत विभागाला आदेश दिले. (हेही वाचा, Shivshahi Bus Caught Fire: शिवशाही बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे 42 प्रवाशांचे प्राण वाचले, पुणे येथील दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल )
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपघाताची दखल
गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2024
अपघाताची घटना दुर्दैवी: देवेंद्र फडणवीस
दरम्यान, राज्यातील भाजप नेते आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जाणारे देवेंद्र फडणवीस यांनी देखील अपघाताची दखल घेतली आहे. एक्स (जुने ट्विटर) वर एक पोस्ट लिहीत त्यांनी म्हटले आहे की, 'गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा, असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकार्यांना सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत. या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.'