महाराष्ट्रातील गोंदिया (Gondia) जिल्ह्यात सोमवारी सकाळी एका मालवाहू ट्रेनची धडक बसल्याने एका वाघाचा (Tiger) मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील गोंगली आणि हिरडामाली रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी आठ वाजता ही घटना घडल्याचे वनाधिकारी यांनी सांगितले. हिरडामाली रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरांनी वन अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. हे ठिकाण नागपूरपासून सुमारे 100 किमी अंतरावर आहे. या वाघाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला असल्याची माहिती मिळत आहे.
याआधी 3 मार्च रोजी गोंदियातील गंगाझारी रेल्वे स्थानकाज दोन अस्वलांनाही प्रवासी गाडीची धडक बसली होती. नुकतेच राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घडलेल्या एका घटनेत वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा बळी गेला असून, दुसऱ्या घटनेत अस्वल हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती चंद्रपूर जिल्ह्यातील जंगल अधिकाऱ्यांनी आज दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील सेंट्रल चंदा डिव्हिजनच्या चेक अस्था पोंभुर्णा जंगलामध्ये बुधवारी रात्री वाघाने एका व्यक्तीवर हल्ला केला, अशी माहिती चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रविण यांनी दिली. (हेही वाचा: Pune Accident: पुणे रेल्वे स्थानकाजवळ टँकरची दुचाकीला जोरदार धडक; 7 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू)
Maharashtra: A tiger died in Gondia after being hit by a goods train on the Gondia-Balharshah rail route. pic.twitter.com/zdk5wNpMc2
— ANI (@ANI) March 8, 2021
दरम्यान, 2020 च्या अहवालानुसार, भारतात, गेल्या आठ वर्षात शिकारी व इतर कारणांमुळे 750 वाघांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक 173 वाघांचा मृत्यू झाला आहे. 750 पैकी 369 वाघांचा नैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाला आणि 168 वाघांना शिकाऱ्यांनी ठार केले. 70 मृत्यूचा अद्याप तपास सुरु आहे, तर 42 वाघांचा अपघात सारख्या अनैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाला. वाघांच्या मृत्यूबाबत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2016 ते 2020 या पाच वर्षात शेतात बनवलेल्या विद्युत ताराच्या कुंपणाला चिकटून 17 वाघ आणि 18 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. सर्व वाघांचा मृत्यू विदर्भात आणि बहुतेक चंद्रपूर जिल्ह्यात झाला आहे.