
पुणे (Pune) येथील गोल्डमॅन सचिन नाना शिंदे (Goldman Sachin Nana Shinde) याचा खून करण्यात आला आहे. पुणे नगर रस्त्यावर लोणीकंद (Lonikand) येथे अॅक्सीस बँकेसमोर अज्ञातांनी गोळ्या झाडून हा खून केला. सचिन शिंदे (Sachin Shinde) यांच्यावर पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हेही दाखल होते. शिंदे हा सराईत गुन्हेगार होता. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सचिन शिंदे हा सराईत गुन्हेगार होता. लोणीकंद परिसरात तो गोल्डमॅन म्हणून परिचित होता. सचिन शिंदे याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. खून, खूनाचा प्रयत्न यांसह इतरही अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहेत. त्याला काही गुन्ह्यांखाली अटकही करण्यात आली होती. नुकताच तो जामिनावर बाहेर आला होता. (हेही वाचा, Satara: सातारा जिल्ह्यातील जवानाची हत्या; पत्नी, भावजय आणि मेहुण्यानेचं काढला काटा)
लोणीकंद येथील अॅक्सिस बँकेसमोर दुपारी साडेबाराच्या सुमारास उभा असताना सचिन शिंदे याच्यावर मंगळवारी (9 फेब्रुवारी 2021) दुपारी गोळीबार झाला. दोन अज्ञात व्यक्ती अॅक्टीव्हा गाडीवरुन आल्या. त्यापैकी पाठिमागे बसलेल्या व्यक्तीने सचिन शिंदे याच्यावर गोळीबार केला. त्यातील एक गोळी सचिन शिंदे याच्या मानेजवळ लागली. तो जागेवरच कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिंदे याला पाहून हल्लेखोरांनी पळ काढला.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. लोणिकंद पोलिसांनी गुन्ह्याची दखल घेतली असून गुन्हा दाखल केला आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.