Gokul Election 2021: गेल्या कित्येक दिवसांपासून सर्वांना उत्सुकता लागलेली कोल्हापूर गोकुळ दूध (Gokul Milk) उत्पादक संघाची निवडणूक आज होणार आहे. यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून उमेदवार आणि मतदानकर्त्यांनी केंद्राबाहेर गर्दी केली आहे. या निवडणुकीत 21 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात आहेत.या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज पेट्यांमध्ये बंद होणार आहे. या निवडणुकीसाठी 3650 पात्र सभासद होते मात्र दुर्दैवाने यातील तिघांचा मृत्यू झाल्याने आज 3647 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या निवडणुकीत सत्ताधारी आमदार पी एन पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने आव्हान दिलं आहे.हेदेखील वाचा- Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2021: गोकुळ दूधसंघ निवडणुकीस हिरवा कंदील, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली सत्ताधाऱ्यांची याचिका
कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यात गोकुळचे कार्यक्षेत्र आहे. या निवडणुकीत 3656 एकूण मतदार असून त्यापैकी 3 जण मयत आहेत. 70 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी 385 शासकीय कर्मचारी मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. कोरोना बाधित मतदारांना पीपीई किट घालून मतदान करता येणार आहे.
गोकुळ दूध उत्पादक संघासाठी निवडणूक कार्यक्रम या आदीच जाहीर झाला आहे. कोरोना व्हायरस संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक वर्षभर लांबली होती. मात्र आता न्यायालयाच्या निर्णयामुळे ही निवडणूक पार पडत आहे. तर 4 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ दूधसंघ नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. कारण, ज्याच्याकडे गोकुळची सत्ता त्याच्याकडे जिल्ह्याची सत्ता असे एक समिकरणच गेली अनेक वर्षे जमले आहे.