गोंदिया: भरधाव कारच्या धडकेत 10 वी च्या परीक्षेसाठी निघालेल्या एका विद्यार्थीनीचा मृत्यू तर दोघीजणी जखमी
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

गोंदिया येथील बालाघाट मार्गावर सावरी गावाजवळ एका भरधाव कारने दहावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या तीन विद्यार्थिनींना उडवले. या अपघातात एका विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोघी गंभीर जखमी आहेत. जखमी विद्यार्थींनीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला असून त्यानंतर संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड करत रास्ता रोको केला. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं आहे. (मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघातांची मालिका सुरूच; कार आणि ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, 4 जखमी)

राज्यात आजपासून सुरु झालेल्या 10 वीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. यात एका विद्यार्थीनीला आपले प्राण गमवावे लागले. करीअरच्या दृष्टीने महत्त्वाची असलेल्या दहावीच्या परीक्षेला या निष्पाप मुलींना मुकावे लागले आहे. यापूर्वी सुरु झालेल्या 12 वीच्या परीक्षेदरम्यान अपघातात एका विद्यार्थ्याला आपले प्राण गमवावे लागले होते. सोलापूरमधील मोहोळ येथे परीक्षाकेंद्रावर जात असताना दुचाकीने दिलेल्या धडकेत या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला होता.

अलिकडच्या काळात अपघातांचे वाढलेले प्रमाण पाहता वाहन चालकांनी तसंच नागरिकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे अपघातांना आळा बसून निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागणार नाहीत.

आजपासून राज्यात 10 वीच्या परीक्षेला सुरुवात झाली. आज पहिला पेपर मराठीचा होता. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळातून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. 3-23 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा सुरु राहणार आहे.