General Merit List of State Services Main Exam 2021: राज्यसेवा 2021 ची गुणवत्ता यादी जाहीर;  प्रमोद चौगुले सलग दुसर्‍यांदा अव्वल
MPSC | (File Photo)

एमपीएससी कडून काल राज्यसेवा 2021 ची गुणवत्ता यादी ( General Merit List of State Services Main Exam ) जाहीर केली आहे. या यादीत यंदा पुन्हा प्रमोद चौगुले (Pramod Chaughule) अव्वल आला आहे. प्रमोद सलग दुसर्‍यांदा राज्यात पहिला आला आहे. सध्या नाशिकच्या उद्योग उपसंचालक पदावर काम करणारा प्रमोद आता त्याच डीवायएसपी अर्थात  पोलीस उपअधीक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याने खाकी गणवेशामध्ये दिसणार आहे.

प्रमोद चौगुले याचे वडील टेम्पो चालवतात तर आई शिवणकाम करून त्यांच्या संसाराला हातभार लावते. मिरज मधील सोनी हे प्रमोदचे मूळ गाव आहे. मागील 7 वर्ष कामासाठी चौगुले कुटुंब सांगली मध्ये आले. प्रमोद चौगुले याचं शिक्षण पलूस येथील नवोदय विद्यामंदिर आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण व वालचंद कॉलेजमधून झाले.

प्रमोद 2020 साली पहिल्यांदा एमपीएससी च्या परीक्षेमध्ये पहिला आला होता. तेव्हा त्याची उद्योग विभागात उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली. पण त्याला पोलिस विभागात काम करण्याची इच्छा होती. म्हणून त्याने 2021 साली पुन्हा परीक्षा दिली आणि या प्रयत्नामध्ये तो डीवायएसपी म्हणून काम करण्यासाठी सज्ज झाला आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या निकालात प्रमोद चौगुले राज्यात पहिला आला आहे. तर मुलींमधून सोनाली मात्रे अव्वल ठरली आहे. उपजिल्हाधिकारी, उपअधीक्षक आणि तहसीलदार यांच्यासह 405 जागांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. सध्या ही तात्पुरती असून अंतिम दाव्यांनंतर त्यामध्ये बदल होऊ शकतात.