
समलैंगिक लोकांसाठी असलेल्या ‘ग्राइंडर’ या डेटिंग अॅपवरून (Grindr Gay Dating App) फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दिल्ली, मुंबई या ठिकाणी याबाबत गुन्हेही दाखल झाले आहेत. आता पुण्यातूनही (Pune) या अॅपबाबत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गे डेटिंग अॅप वापरून लोकांना फसवणाऱ्या आणि लुटणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीने आतापर्यंत 50 हून अधिक तरुणांना फसवले आहे, अशी माहिती आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये समलिंगी डेटिंग अॅप्सवर भेटलेल्या विविध व्यक्तींकडून हल्ला, ब्लॅकमेल, लैंगिक शोषण आणि लुटमारीची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
सामच्या वृत्तानुसार, पोलिसांनी या प्रकरणात एकूण चार जणांना अटक केली आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशनचे पथक या प्रकरणात पुढील तपास करत आहे. यानंतर आता पोलिसांनी लोकांना सावधगिरी बाळगण्याचा इशाराही दिला आहे. माहितीनुसार, ही टोळी प्रथम पिंपरी परिसरातील तरुणांशी ‘ग्राइंडर’ डेटिंग अॅपद्वारे ओळख करायची. त्यानंतर ही टोळी तरुणांना मंगळवार पेठ परिसरातील आरटीओ चौकात बोलावून त्यांना मारहाण करून लुटत असे. आतापर्यंत त्यांनी 50 हून अधिक तरुणांना फसवले आहे.
या टोळीने अलिकडेच एका तरुणाची या अॅपद्वारे मोठी फसवणूक केली. सुरुवातीला या टोनीने तरुणाशी मैत्री केली, त्यानंतर त्याला भेटायला बोलावले. हा तरुण भेटायला गेल्यावर त्यांनी त्याला मारहाण करून, त्याचे डेबिट कार्ड, मोबाईल फोन आणि कारच्या चाव्या हिसकावून घेतल्या. यासह डेबिट कार्डचा पिन नंबर जाणून घेतल्यावर, आरोपींनी एटीएममधून 9 हजार 500 रुपये काढून घेतले. यानंतर या तरुणाने हिम्मत दाखवून पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी 4 आरोपी तरुणांना अटक केली आहे. (हेही वाचा: Gay Imam Muhsin Hendricks Shot Dead: उघडपणे समलैंगिक म्हणून जीवन जगणारे जगातील पहिले इमाम मुहसिन हेंड्रिक्स यांची गोळ्या घालून हत्या; LGBTQ समुदायाने व्यक्त केला निषेध)
दरम्यान याधीही जानेवारीमध्ये पुण्यातून अशीच घटना समोर आली होती. ग्राइंडर अॅपवरून लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत, धायरी व नांदेड सिटी परिसरात चार गुंडांच्या गटाने अनेक लोकांची रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लुटून फसवणूक केली होती. अशा फसवणुकीच्या घटना काही काळापासून सुरू होत्या, मात्र सामाजिक कलंकामुळे पीडितांना त्यांच्या अत्याचाराची तक्रार पोलिसांकडे केली नव्हती. मात्र एका 32 वर्षीय हॉटेल व्यावसायिकाने नांदेड शहर पोलिसांकडे या टोळीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर सापळा रचून आरोपींना पकडण्यात आले. महत्वाचे म्हणजे आरोपी आणि त्याचे साथीदार समलैंगिक नव्हते, परंतु ते समलैंगिक असल्याचे भासवत असत.