Gauri Lankesh Murder Case: मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला अटक
Gauri Lankesh (PC - ANI)

Gauri Lankesh Murder Case: ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश Gauri Lankesh) यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकर याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाने झारखंडमधील धनबाद (Dhanbad)

जिल्ह्यातील कतरास येथून आरोपी ऋषिकेशच्या मुसक्या आवळल्या. 5 सप्टेंबर 2017 रोजी बंगळुरूमध्ये गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. गौरी लंकेश हत्या प्रकरणात आतापर्यंत 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ऋषिकेश हा मुळचा औरंगाबाद जिल्ह्यातील असून तो ओळख बदलून धनबाद येथे राहत होता.

कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी कतरास येथे छापे टाकले. या कारवाईमध्ये ऋषिकेष उर्फ अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी ऋषिकेशच्या घराची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना त्याच्या घरात सनातन धर्माशी संबंधित अनेक पुस्तकं सापडली. मुख्य आरोपी ऋषिकेश गेल्या 6 महिन्यांपासून कतरास येथील पेट्रोल पंपावर काम करत होता. या पेट्रोल पंपाचे मालक प्रदीप खेमका यांच्या मालकीच्या घरात आरोपी ऋषिकेश राहत होता. येथे तो आपली ओळख लपवून राहत होता. (हेही वाचा - डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यतिथी दिवशी अंनिस कडून 'जबाब दो आंदोलन')

आरोपी ऋषिकेशला आज (शुक्रवार) धनबादमधील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रकरणातील अधिक चौकशी करण्यासाठी त्याला बेंगळुरूमध्ये आणण्यात येणार आहे. गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी 5 सप्टेंबर 2017 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.