
यावर्षी कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या पार्श्वभूमीवर, उन्हाळ्यात लग्न समारंभांवर असलेल्या निर्बंधामुळे अनेक बँड कलाकार (Band Artists) कामापासून वंचित राहिले आहेत. लॉक डाऊनच्या (Lockdown) काळात यातील अनेकांच्या कामावर कुऱ्हाड कोसळली आहे. आता या बँड कलाकारांना मंगळवारी, गणेशोत्सवाच्या समाप्तीच्या (Ganpati Visarjan 2020) वेळी काम मिळण्याची आशा आहे. मार्चमध्ये लॉकडाउन लागू झाल्यानंतर महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक बँड कलाकारांना आपला व्यवसाय सोडावा लागला. लॉक डाऊनमुळे, लोकांनी गेल्या काही महिन्यांत लग्नाचे कार्यक्रम पुढे ढकलले किंवा रद्द केले आहेत, ज्यामुळे बॅन्ड कलाकारांना वाद्ये वाजवण्याचे काम मिळाले नव्हते.
'अनंत चतुर्दशी' दिवशी दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होते. मूर्तींचे विसर्जन अशी एक गोष्ट आहे ज्यामुळे बँड कलाकारांना काम मिळू शकते. औरंगाबाद येथील बॅन्ड वादक निसार कुरेशी यांनी पीटीआय-भाषेला सांगितले की, ‘विवाह सोहळा सहसा मार्च ते मे आणि नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान होतात. यावर्षीच्या निम्मा हंगामात आमचे कोणतेही उत्पन्न झाले नाही कारण लॉकडाऊनमुळे अनेक लग्न समारंभ रद्द केले. मात्र आज तरी मोठ्या प्रमाणावरील उत्सवांना परवानगी नसली तरी, आम्हाला गणपती विसर्जनावेळी काही प्रमाणात तरी काम मिळेल अशी अशा आहे.’ (हेही वाचा: जगातील टॉप 10 कोरोना पीडित देशातील 6 देशांपेक्षा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांंचा आकडा अधिक, वाचा सविस्तर)
कुरेशी यांचे कुटुंब चार पिढ्यांपासून बॅन्ड वाद्य वाजवत आहे. सद्यस्थितीची त्यांनी कल्पनाही केली नव्हती, असे म्हणतात. अशोक मोरे नावाच्या आणखी एका बँड कलाकाराने सांगितले की, दरवर्षी त्याला इतर शहरांतूनही काम मिळायचे, परंतु यावेळी त्यांना काहीच काम मिळाले नाही. ते म्हणाले, ‘औरंगाबादमध्ये 50 बँड वादक आहेत, त्यापैकी जवळपास दहा जणांनी कर्जामुळे हा व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने आम्हाला मदत केली पाहिजे.’ मोरे पुढे म्हणाले की, सरकारला त्यांच्या समस्यांविषयी जागरूक करण्यासाठी बुधवारी आंदोलन करण्याचा त्यांचा विचार आहे.