Ganeshotsav & Dahi Handi 2022:  गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बंधमुक्त, मूर्तीवरील उंचीची मर्यादा हटवली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Ganeshotsav & Dahi Handi 2022 | (Photo Credit: Archived, edited, representative images)

कोरोना व्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) काळात सण, उत्सवांवर घालण्यात आलेल्या मर्यादा, निर्बंध हटविण्याचा महत्वपूर्ण निर्णय विद्यमान सरकारने घेतला आहे. त्यामुळे यंदा दहीहंडी (Dahihandi 2022), गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) धुमधडाक्यात हे निश्चित झाले आहे. याशिवाय गणेशोत्सव काळात गणपती मुर्तींवर लावण्यात आलेले उंचीचे निर्बंधही हटविण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली आज एक बैठक पार पडली. या बैठकीत आगामी सण उत्सवाच्या काळात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.

गणेशोत्सवासाठी अधिक गाड्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे राज्यात पाठिमागचे दोन वर्षे सण, उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले होते. यंदा हे सर्व निर्बंध हटविण्यात येत आहेत. याशिवाय कोकणात जाणाऱ्या आणि राज्यातील गणेशभक्तांना प्रवासासाठी अधिकच्या एसटी बसेल सोडण्याबाबत प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. परिवहन विभागालाही वाहतूक नियोजनाचे आदेश देण्यात आले आहेत. (हेही वाचा, Happy Gatari HD Images: 'गटारी' च्या द्या मजेशीर शुभेच्छा, WhatsApp Status, Messages च्या माध्यमातून करा विश, पाहा व्हिडीओ)

मूर्तीवरील उंचीचे निर्बंध हटवले

गणेशोत्सव काळात बसवल्या जाणाऱ्या गणपती मूर्तीसाठी उंचीचे कोणतेही निर्बंध असणार नाहीत. त्यामुळे मंडळांना हव्या तेवढ्या उंचीच्या मूर्ती नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहून बसवता येणार आहेत. याशिवाय, गणपतीचे आगमन होणाऱ्या सर्व रस्त्यांवरील खड्डेही बुजविण्यात येतील. याशिवाय गणेश मंडळ नोंदणीसाठी एक खिडकी योजना राबवण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदुषण अथवा इतर काही कारणांमुळे दाखल झालेले गुन्हे अभ्यास करुन शक्य तितके मागे घेण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

कोरोना काळात निर्बंधांमुळे मर्यादीत स्वरुपात साजरे करावे लागलेले उत्सव यंदा प्रथमच मोठ्या धुमधडाक्यात साजरे होतील. राज्य सरकारच्या या निर्णयाचा अनेक गणपती मंडळे आणि गोविंदा पथकांनीही जल्लोषात स्वागत केले आहे.