BAPPA | (Photo Credits: PixaBay)

महाराष्ट्रात यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav) अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्या आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (Ganesh Mandals) यांच्यात आज (18 जून 2020) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सूचना आणि निर्णय मान्य असल्याचे मंडळांनी या वेळी सांगितले. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट अधिक गरीहे होत असताना राज्यातील सर्वात मोठा उत्सव अशी ओळख असलेला गणेशोस्तव अवघे दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सुरु असलेला लॉकडाऊन (Lockdown) आणि पाळले जाणारे सोशल डिस्टन्सिंग यांमुळे यंदा गणेशोत्सवाचे काय होणार? हा प्रश्न गणेश भक्तांसह सर्वांनाच सतावत होता. दरम्यान, या प्रश्नावर आता तोडगा निघाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, यंदा राज्यासमोर असलेले कोरोना व्हायरस संकटाचे आव्हान पाहता सर्वच गणेश मंडळांनी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. त्याला सर्वच गणेश मंडळांनी एकमुखी सहमती दर्शवली. तसेच, राज्य सरकारचे निर्णय आणि सूचना आपल्याला मान्य आहेत. सरकारला आवश्य ते सर्व सहकार्य करण्याची गणेश मंडळांची तयारी आहे. कोणताही अडथळा आणला जाणार नाही, असे अश्वासन मंडळांनी या वेळी दिले.

ट्विट

ट्विट

दरम्यान, राज्य सरकारच्या सूचनेनंतर केवळ गणेशोत्सव साधेपणाने नव्हे तर आगमन सोहळेही रद्द करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी घेतला आहे. प्रामुख्याने मुंबईतील प्रसिद्ध अशा चिंतामणी गणेश मंडळाने आगमन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हे गणेश मंडळ आता मंडपातच गणेशमूर्ती घडवणार आहे. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी घेतला महत्वाचा निर्णय)

दरम्यान, गणेशोत्सव साधेपणाने साजरे करत असताना आगमन सोहळे रद्द झाले आहेत. त्यासोबतच गणेशविसर्जन मिरवणूक काढण्यासही परवानगी नाही. त्यामुळे गणेश मंडळांना मिरवणुकाही अत्यंत साधेपणाने काढाव्या लागणार आहेत. तसेच गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपकाचा वापर, आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नाही. गणेश मंडळ पदाधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकांमध्ये त्याबाबतची माहिती देण्यात येत आहे.