
Pune Railway Station News: पुणे रेल्वे स्थानकावर रविवारी रात्री उशिरा एका व्यक्तीने महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना (Gandhi Statue Vandalism) करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीचे नाव सुरज शुक्ला ( Suraj Shukla Arrested) असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज शुक्ला हा स्थानक परिसरात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर धारदार वस्तूने हल्ला करत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, स्थानिक नागरिकांनी वेळेवर हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले आणि तत्काळ रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.
झोन 2 चे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिटे यांनी सांगितले की, आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा संशय आहे. त्याच्या बहिणीच्या अलीकडील मृत्यूमुळे तो मानसिक तणावात होता, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र सर्व बाजूंनी सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर शाखेने घटनेचा तीव्र निषेध करत स्थानक परिसरात आंदोलन केले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुधाभिषेक घालून आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाने स्थानक परिसरातील सुरक्षेत वाढ केली आहे. पोलिसांकडून सध्या सखोल चौकशी सुरू असून अधिक तपशील लवकरच उघड केला जाणार आहेत.