Gadchiroli Bandh: गडचिरोली जिल्ह्यात तसेच तीन राज्यांच्या सीमाभागात हाय अलर्ट जारी; तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ
Representational Image | (Photo Credit: PTI)

1 मे, महाराष्ट्र दिनाला गालबोट लागणारी घटना राज्यात घडली होती. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात जांभूरखेडा गावाजवळ माओवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून सी-60 जवानांना लक्ष्य केले. या हल्ल्यात 15 जवान आणि 1 चालक मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर आज माओवाद्यांकडून गडचिरोली बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांकडून घडत असलेल्या हिंसक घटना पाहता, संपूर्ण जिल्ह्यात तसेच तीन राज्यांच्या सीमाभागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एट्टापली तालुक्यातील गुरूपल्ली मार्गावर, आलापल्ली मार्गावर आणि भामरागड मार्गावर माओवाद्यांनी लाल बॅनर लावून आजच्या बंदची माहिती दिली होती.

27 एप्रिल रोजी झालेल्या खोटया चकमकीत, रामको तसेच शिल्पा ध्रुवा या महिला माओवाद्यांना मारल्याचा आरोप माओवाद्यांनी केला होता. त्यानंतर, जवानांच्या ताफ्यावर हल्ला करून, गडचिरोलीमध्ये पूल आणि रस्ते बांधू नका असे बॅनर उत्तर गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांकडून लावण्यात आले होते. त्यानंतर 19 मे रोजी गडचिरोली बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.  (हेही वाचा: जवानांच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर, बॅनर लावून नक्षलवाद्यांची धमकी; असा रचला हल्ल्याचा कट)

दरम्यान, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज, सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. सीमेवरील मेडीगड्डा-कालेश्वर प्रकल्पाला ते भेट देणार आहेत. या भागान माओवाद्यांनी केलेल्या कारवाया लक्षात घेता, या परिसराच्या तपासणीसाठी हैदराबादहून ग्रे-हाउंडच्या विशेष जवानांना पाचारण करण्यात आले आहे. या पथकाने सीमेवरील सुरक्षा वाढवत या परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे.