नक्षलवाद्यांनी बॅनर लावून दिलेली धमकी (संग्रहित-संपादित प्रतिमा)

काल, 1 मे महाराष्ट्र दिना रोजी गडचिरोली (Gadchiroli) भागात नक्षलवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 15 जवान आणि 1 चालक मृत्युमुखी पडले. जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगाचा स्फोट घडवून यामध्ये सी-60 जवानांना लक्ष्य करण्यात आले. काल हा हल्ला घडल्यानंतर आज नक्षलवाद्यांनी सरकारला बॅनर लावून धमकी दिली आहे. गडचिरोलीमध्ये पूल आणि रस्ते बांधू नका, असे बॅनर उत्तर गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांकडून लावण्यात आले आहे. आता या बॅनरमुळे परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे.

कसनासूरच्या जंगलात शिघ्र कृती दलाने केलेल्या कारवाईत 40 नक्षलवादी ठार झाले होते. या गोष्टीचा बदला घेण्यासाठीच नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी नक्षलवाद्यांनी 36 वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर बंदोबस्तासाठी हे जवान जात असताना या ताफ्यावर हल्ला झाला. आज राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. (हेही वाचा: गडचिरोली नक्षलवादी हल्ल्यानंतर शरद पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल, राजीनाम्याची मागणी)

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यापासून या हल्ल्याची तयारी सुरु होती. गडचिरोली, छत्तीसगड येथील नक्षलवाद्यांनी एकत्र येऊन त्यांचा एक ग्रुप तयार केला. यामध्ये जवळजवळ 150 नक्षलवादी सामील झाले होते, आणि या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एका विशेष सप्ताहाचे आयोजनही केले होते. जवानांना टार्गेट करणे सोपे व्हावे यासाठी आधी वाहनांची जाळपोळ केली गेली. त्यानंतर जवानांच्या प्रत्येक हालचालींची माहिती खबऱ्यापर्यंत पोहचण्याची व्यवस्था केली. शेवटी सुरुंगाचा स्फोटाद्वारे जवानांवर हल्ला केला.