11th Std Online Admission Process 2020-21 : महाराष्ट्रामध्ये रखडलेली 11 वी ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान मराठा आरक्षण म्हणजेच SEBC चे आरक्षण वगळून आता विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. दरम्यान त्याची सुरूवात उद्या 26 नोव्हेंबर पासून केली जाणार आहे. दरम्यान ज्या विद्यार्थांनी यापूर्वी मराठा कोटा/ आरक्षण अंतर्गत नोंद केली आहे त्यांना आता कॅटेगरी बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच 11वीच्या प्रवेशासाठी इच्छुक सार्या विद्यार्थ्यांना कॉलेजचे पसंतीक्रम बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी 1 डिसेंबर पर्यंतची वेळ असेल. दरम्यान संपूर्ण वेळापत्रक 11thadmission.org.in या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आलं आहे.
दरम्यान शिक्षण मंडळाकडून जारी करण्यात आलेल्या नव्या वेळापत्रकानुसार दुसरी मेरीट लिस्ट 5 डिसेंबरला सकाळी 11 वाजता जाहीर केली जाईल. तर ही प्रवेश प्रक्रिया 9 डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे. तसेच पहिल्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना ज्या कोणत्याही कॅटेगरीमधून अॅडमिशन मिळाले असेल ते त्यांच्यासाठी अंतिम झालेले असेल अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या उर्वरित सार्यांसाठी नवी प्रवेश प्रक्रिया लागू असेल. विद्यार्थ्यांना कॉलेजची फी ऑनलाईन माध्यमातूनच भरणं बंधनकारक असेल असे देखील या मध्ये सांगण्यात आले आहे. 9 सप्टेंबर 2020 पूर्वी एसईबीसी प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज केला असेल मात्र अद्याप प्रवेश दिला गेला नसेल तर अशा एसईबीसी विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश दिला जाणार आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत हा महाराष्ट्र राज्याचा शासन निर्णय लागू राहणार आहे. Maratha Reservation: मराठा समाजाच्या उमेदवारांना शिक्षण आणि नोकरी मध्ये देण्यात येणार्या एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालया कडून स्थगिती.
11 वी प्रवेशप्रक्रिया वेळापत्रक
इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठीच्या पुढील सूचना व वेळापत्रक https://t.co/EqJTIhRVbb या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat pic.twitter.com/GzNyCvNyds
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) November 25, 2020
महाराष्ट्र राज्यांत 10 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी 11 वी प्रवेशासाठी प्रतिक्षेत आहेत. 9 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी करत पुढील वर्षभरासाठी नोकरी व शिक्षणांत मराठा आरक्षण लागू न करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आधी कोरोना संकट आणि त्यापाठोपाठ आता मराठा आरक्षण स्थगितीमुळे मागील अडीच महिन्यांपासून 11 वी ची प्रवेश प्रक्रिया खोळंबली होती.