First Year Admission | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात FYJC म्हणजेच 11वीची प्रवेशप्रक्रिया येत्या आठवड्याभरात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान काल (24 नोव्हेंबर) रात्री उशिरा मंत्रिमंडळाने सप्टेंबर महिन्यापासून रखडलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट केले आहे. काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर 11 वीचे प्रवेशदेखील रखडले होते मात्र आता मराठा आरक्षणाशिवायच ते पुन्हा सुरू करण्याच्या तयारीमध्ये राज्य सरकार आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील मीडीयाशी याबद्दल बोलताना पुढील 2 दिवसांत आध्यादेश काढण्याची गोष्ट बोलून दाखवली आहे.

दरम्यान 9 सप्टेंबर 2020 नंतरचे प्रवेश एसईबीसी वर्गासाठी आरक्षण न ठेवता करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. मराठा संघटनांनी जो पर्यंत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तो पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू न करण्याची आग्रही भूमिका घेतली होती. मात्र यामुळे मागील अडीच महिने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. ते घरीच बसून आहेत. त्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आता सरकार पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यासाठी जीआर देखील काढण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाकडून देखील काल (24 नोव्हेंबर) राज्य सरकारला नोटीस धाडत 11 वी प्रवेश प्रक्रियेबाबत प्रश्न विचारण्यात आले आहेत. यासाठी वकील विशाल सक्सेना यांनी बॉम्बे हाय कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. 10 वीचे निकाल लागल्यानंतर राज्यांत 10 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी 11 वी प्रवेशासाठी प्रतिक्षेत आहेत. Maratha Reservation: जातीय सलोखा कायम राखत मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावा, दुजाभाव नको; ओबीसी नेत्यांची राज्य सरकारकडे मागणी.

सध्या मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली कायदेशीर लढाई लढत आहे. त्यांनी अर्ज दाखल केले आहेत.