प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

नवीन बांधण्यात आलेल्या विहिरीत बाप लेकासह 4 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील आमगावात गुरुवारी सकाळी घडली आहे. गावातील एका व्यक्तीने आपल्या शेतात विहीर बांधली होती. या विहिरीचे गुरुवारी सकाळी पूजन करण्यात येणार होते. मात्र, विहिरीचे पूजन करण्यापूर्वीच दुर्दैवी घटना घडली आहे. गावातील विहिरीत गुदमरून चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती क्षणाभरातच संपूर्ण गावात पसरली. त्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती प्रशासन, पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाला दिली. यानंतर प्रशासन यंत्रणा, पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढले. चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आत्माराम भांडारकर, झनक भांडारकर, राजू भांडारकर आणि धनराज गायधने ही मृत्यू झालेल्या लोकांची नावे आहेत. आत्माराम भांडारकर यांनी आपल्या शेतात नवीनच विहीर बांधली होती. आज सकाळी या विहिरीचे पूजन करण्यात येणार होते. यामुळे भंडारकर यांनी बुधवारी सांयकाळी विहिरीत तुरटी, ब्लिचिंग पावडर टाकली होती. त्यानंतर आज सकाळी या विहिरीतून गढूळ पाणी बाहेर काढण्यासाठी आत्माराम आणि त्यांचा मुलगा झनक हे दोघेही विहिरीत उतरले होते. मात्र, ते बाहेर परतलेच नाही. त्यानंतर त्यांना पाहण्यासाठी गावातील इतर दोघेजण विहिरीत उतरले आणि त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. या चौघांचाही विहिरीत गुदमरून मृत्यू झाला आहे. विहिरीत विषारी वायुमुळे चौघांचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. हे देखील वाचा- मुंबई: शेजारणीशी होणाऱ्या वादातून 4 वर्षांच्या मुलाची हत्या; अंधेरी येथील महिला अटकेत

 

पीटीआयचे ट्विट-

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले असताना गोंदिया येथील घटनेने राज्यातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विहिरीचे पूजन करण्यापूर्वीच भांडारकर कुटुंबियातील तिघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.