मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीने (ED) अटक केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange) कर्मचाऱ्यांचे फोन अवैधरित्या टॅप करणे, तसेच धनसंचय केल्याचा संजय पांडे यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात त्यांची पाठीमागील काही दिवसांपासून चौकशी सुरु होती. या प्रकरणात चौकशीसाठी ते ईडी कार्यालायत मंगळवारी (19 जुलै) दाखल झाले होते. या वेळी ईडीने ही कारवाई केली. भारतीय पोलीस सेवेतू (IPS) निवृत्त झाल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून संजय पांडे यांच्या पाठिमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. विशेष म्हणजे संजय पांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आजच (19 जुलै) घेतली होती. त्यानंतर काही तासातच ईडीने कारवाई करत त्यांना अटक केल्याचे वृत्त आले.
काय आहे प्रकरण?
अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे (NSE) सुरक्षा ऑडीटसाठी त्याच्याद्वारे एक कंपनी सुरु करण्यात आली होती. या कंपनीच्या आर्थिक उलाढालीसंबंधीच विविध मुद्द्यांवरुन त्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. संजय पांडे यांचे सर्व जबाब मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा (Prevention of Money Laundering Act) अन्वये नोंदवण्यात आल्याचीही माहिती आहे. (हेही वचा, Money Laundering Case: सीबीआय कडून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि संजय पांडे यांची चौकशी)
संजय पांडे हे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त म्हणून चार महिने पदावर राहिले असतानाच ते निवृत्त झाले. त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी पोलीस महासंचालक (Acting Director General of Police) म्हणूनही प्रदीर्घ काळ काम पाहिले आहे. दरम्यान, केंद्रीय अन्वेशन ब्युरो (सीबीआय) ने सोमवारी म्हटले होते की, त्यांनी संजय पांडे आणि मुंबईतील आणखी एक माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपये वसूलीच्या केलेल्या आरोपाबाबतही चौकशी केली.
ट्विट
The Enforcement Directorate (ED) today arrested former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey in connection with National Stock Exchange (NSE) co-location scam case: ED
(File Pic) pic.twitter.com/KkJJwvSPD4
— ANI (@ANI) July 19, 2022
एनएसईच्या कर्मचाऱ्यांच्या कथीत फोन टॅपींग प्रकरणात सीबीआय आणि ईडी दोन्ही संस्थांकडून संजय पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने या महिन्याच्या सुरुवातीला ‘को-लॉकेशन’ घोटाळ्यातही त्यांची चौकशी केली होती.