
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ‘विजय शिवतारे’ (Vijay Shivtare) हे फार मोठे नाव आहे. आता शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर आला आहे. आज पहाटे विजय शिवतरे यांना हृदयविकाराचा झटका आला व सध्या त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांची मुलगी ममता लांडे-शिवतारे यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांचे भाऊ व विजय शिवतारे यांचे मुलगे विनय आणि विनस शिवतारे यांच्यावर वडिलांचा मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्याच धक्क्याने विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका आला असे त्या म्हणाल्या आहेत.
आपल्या पोस्टमध्ये ममता यांनी म्हटले आहे की, ‘माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून बाबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील वर्षी बाबांचे ऑपरेशन झाल्यावर त्यांच्या जीवाला धोका असतानाही माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन त्यांना मानसिक त्रास देत होता. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून, त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सूरु झाले.’ त्या पुढे म्हणतात, ‘आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे.’
या आरोपानंतर विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी आपल्या मुलीच्या आरोपांना उत्तर दिले आहे. मंदाकिनी शिवतारे यांनी मुलगा विनय शिवतारेच्या फेसबुक अकाऊंटवरुन लाईव्ह येत ममता लांडे यांचे सर्व आरोप पूर्णतः खोटे असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा: शिवसेनेचे नेते Sanjay Raut यांच्यावर महिलेचे गंभीर आरोप; हाय कोर्टाने दिले चौकशीचे आदेश, जाणून घ्या सविस्तर)
त्या म्हणतात, ‘गेल्या 27 वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त राहत आहेत. त्यातील पहिली पाच वर्ष ते एका महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत दुसऱ्या एका महिलेसोबत पवई येथे राहत आहेत. यामध्ये संपत्ती हा वादाचा विषय नसून, विजय शिवतारेंकडून दोन वर्षांपासून सुरु असलेली मानसिक छळवणूक थांबवणे आणि मानसिक जाचातून सुटका करुन घेणे, हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे.’