एका 36 वर्षीय महिलेने शिवसेनेचे (Shiv Sena) ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले आहे की, राऊत यांच्या सांगण्यावरून काही लोकांनी तिचा पाठलाग करून त्रास दिला. या कामात आपल्या पतीनेही संजय राऊत यांना मदत केली, असे तिचे म्हणणे आहे. महिला आपल्या पतीपासून विभक्त झाली आहे. या महिलेच्या या आरोपानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे. जामदार यांच्या खंडपीठाने 24 जून रोजी पोलिस आयुक्तांना या प्रकरणाचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले. याचिका याच वर्षी फेब्रुवारीमध्ये दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये पेशाने मानसशास्त्रज्ञ असलेल्या या महिलेने दावा केला होता की, राज्यसभा सदस्य राऊत आणि तिच्यापासून विभक्त झालेल्या पतीच्या सांगण्यावरून काही अज्ञात लोकांनी तिचा पाठलाग केला.
यामध्ये पुढे आरोप केला आहे की, तिने 2013 आणि 2018 मध्ये तीन तक्रारी केल्या होत्या पण आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नाही. मार्चमध्ये या याचिकेवर सुनावणी झाली तेव्हा राऊत यांचे वकील प्रसाद ढाकेफळकर यांनी या आरोपांचे खंडन करत सर्व आरोप फेटाळून लावले.
महिलेची वकील आभा सिंह यांनी मंगळवारी कोर्टात सांगितले की, ‘याचिका दाखल केल्यानंतर नुकतेच महिलेला बनावट पीएचडी पदवी मिळविल्याच्या आरोपामध्ये अटक करण्यात आली आहे. सध्या याचिकाकर्ता दहा दिवसांसाठी तुरूंगात आहे. हायकोर्टात याचिका दाखल केल्यापासून संपूर्ण पोलिस यंत्रणा तिच्या मागे लागली आहे. ही गोष्ट सूड उगवण्याच्या कारवाईमधून झाली आहे.’ (हेही वाचा: खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; Bombay HC च्या निर्णयाला स्थगिती)
कोर्टाने म्हटले आहे की, याचिकाकर्ते तिच्या अटकेला आव्हान देणारी स्वतंत्र याचिका दाखल करू शकते. खंडपीठाने सांगितले की, आम्ही पोलिस आयुक्तांना याचिकेत केलेल्या तक्रारींची चौकशी करून योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश देतो. 24 जून रोजी पोलिस आयुक्तांनी या संदर्भात अहवाल द्यावा.