Food  Poisoning In Nanded: नांदेड मध्ये भंडार्‍याच्या जेवणातून सुमारे 2000 जणांना विषबाधा
Representational Image (Photo Credit: PTI)

नांदेड (Nanded) मध्ये एका धार्मिक सोहळ्यामध्ये सुमारे 2000 हजार लोकांना जेवणातून विषबाधा (Food Poisonings)  झाल्याची घटना समोर आली आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहा (Loha) तालुक्यातील कोष्टवाडी (Koshtawadi) येथे भंडार्‍याचे आयोजन करण्यात आलं होतं. हजारो भाविकांनी प्रसाद घेतल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. नंतर भाविकांना शासकीय आणि खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. हा महाप्रसाद सावरगाव, नसरत, रिसनगाव, हरणवाडी, आष्टूरसह गावातील हजारो लोक आले होते.

दरम्यान प्रसादामध्ये भगर म्हणजे वरईचा भात होता. तो खाल्ल्यानंतर रात्री 2 च्या सुमारास त्यांना त्रास होण्यास सुरूवात झाली. अनेकांना डोकेदुखी, उलटीचा त्रास जाणवू लागला. सोबतच काहींना चक्कर येत होती. त्यामुळे या लोकांना लोहा शहरात शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नक्की वाचा: Bihar Shocker: वसतिगृहात निष्काजीपणा! अर्धवट शिजवलेला भात खाल्ल्याने 30 विद्यार्थीनी आजारी, बिहारमधील घटना .

दरम्यान अचानक रूग्ण वाढल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता पाहून पोलिसांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणांना सतर्क करून मदत करण्याच्या सूचना दिल्या. एसटी बस, खासगी वाहने ट्रॅव्हल्स जीप यांच्या मदतीने रुग्णांना नांदेड, कंधार व अहमदपूर, पालम येथे रुग्ण पाठवण्यास सुरूवात केली. वरिष्ठांना माहिती देऊन लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात औषधांत वाढ करून रुग्णांना अडचण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.