Mumbai Airport (Photo Credit: PTI)

Flight Operations at Mumbai Airport: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) विमान वाहतूक 8 मे रोजी पावसाळ्याच्या आधी धावपट्टी देखभालीच्या कामामुळे सहा तासांसाठी बंद राहणार आहे. यासंदर्भात खाजगी ऑपरेटर MIAL ने माहिती दिली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (MIAL) ने घोषणा केली की, त्यांनी सहा महिने आधीच अनिवार्य NOTAM (विमानचालकांना सूचना) जारी केली आहे, ज्यामुळे सर्व भागधारकांना उड्डाण वेळापत्रक समायोजित करण्यासाठी आणि त्यानुसार कामकाजाचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

विमानतळाच्या वार्षिक मान्सूनपूर्व देखभालीचा भाग म्हणून, 09/27 (प्राथमिक) आणि 14/32 (दुय्यम) या दोन्ही धावपट्ट्या सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तात्पुरत्या बंद राहतील. विमानतळाच्या हवाई पायाभूत सुविधांची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी ही नियोजित देखभाल आवश्यक आहे यावर MIAL ने भर दिला. (हेही वाचा - Palghar-Virar Ro-Ro Ferry Service: आजपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार पालघर-विरार रो-रो फेरी सेवा; तीन सत्रात चालणार, जाणून घ्या प्रस्तावित भाडे रचना)

देखभाल दुरुस्तीच्या काळात तज्ञ धावपट्टीच्या पृष्ठभागावर कोणत्याही प्रकारची झीज होण्याची चिन्हे आहेत का याची कसून तपासणी करतील. येत्या पावसाळ्यात पाणी साचण्याचे धोके कमी करण्यासाठी, सुरक्षित लँडिंग आणि टेक-ऑफ सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील अंमलात आणल्या जातील, असंही विमान अधिकाऱ्याने सांगितले.