Firing On NCP MLA Anna Bansode: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे गोळीबार, आरोपीस पोलिसांकडून अटक
MLA Anna Bansode ( File Photo)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे ( NCP MLA Anna Bansode) यांच्यावर गोळीबार (Firing On Anna Bansode) झाला आहे. अण्णा बनसोडे यांच्या पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे असलेल्या कार्यालयाबाहेर हा प्रकार बुधवारी (12 मे 2021) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतले आहे. तसेच, प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. गोळीबार करणारा आरोपी हा एक ठेकेदार असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड येथील आमदार आहेत. त्यांनी एका ठेकेदारास पिंपरी चिंचवड येथील आपल्या कार्यालयात बोलवून घेतले होते. त्यानुसार हा ठेकेदार त्यांच्या कार्यालयात आला होता. हा ठेकेदार आणि आमदार अण्णा बनसोडे यांच्यात काही काळ संवाद झाला. त्यानंतर दोघेही कार्यालयाबाहेर आले असता ठेकेदाराने अचानक त्यांच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने अण्णा बनसोडे यांच्या दिशेने झाडलेली एकही गोळी त्यांना लागली नाही. त्यामुळे अण्णा बनसोडे यांना कोणतीही ईजा झाली नाही. ते सुखरुप बचावले. (हेही वाचा, पालघर: विरारमध्ये महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्यावर गोळीबार)

दरम्यान, अण्णा बनसोडे यांच्यावर नेमका गोळीबार कोणत्या कारणास्तव झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही. हा काही पूर्ववमनस्याचा भाग होता की या घटनेमागे आणखी काही वेगळी कारणे आहेत याबाबत पोलीस तपास सुरु आहे. मात्र, आमदारांनी कार्यालयात बोलवलेल्या व्यक्तीने अचानक पणे अशा प्रकारे गोळीबार करावा याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.