महाराष्ट्र सरकारने वन्य प्राण्यांच्या (Wild Animals) हल्ल्यात झालेल्या मानवी जीवितहानीसाठी आर्थिक मदत (Financial Assistance) 15 लाखांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली. विधान परिषदेत घोषणा करताना ते म्हणाले की, राज्यात मानव-प्राणी संघर्षाच्या घटना वाढत आहेत. 2019-20 मध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 47 जणांचा मृत्यू झाला, 2020-21 मध्ये अशा घटनांमध्ये 80 लोकांचा मृत्यू झाला आणि 2021-22 मध्ये 86 जणांचा मृत्यू झाला.
आता अशा प्रकरणांमध्ये आर्थिक सहाय्य 15 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात आले आहे. वाघ, बिबट्या, अस्वल, गौर, रानडुक्कर, लांडगा, मगर, जंगली कुत्रा आणि हत्ती यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास ही मदत दिली जाते, असे मंत्री म्हणाले. यासोबतच अशा हल्ल्यात गुरांच्या मृत्यूची भरपाई 60,000 रुपयांवरून 70,000 रुपये करण्यात आली आहे. मेंढी किंवा शेळी मारली गेल्यास 10,000 रुपयांवरून 15,000 पर्यंत रक्कम वाढवण्यात आली आहे.
गुरांना कायमचे अपंगत्व आल्यास नुकसान भरपाई 12,000 वरून 15,000 रुपये, तर मेंढ्यांसाठी 4,000 वरून 5,000 रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी पशुधन नुकसान भरपाईपोटी कमाल 25 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. आता वन्य प्राण्यांपासून शेतपिकांच्या नुकसान भरपाई रक्कमेत मात्र सरकारने कोणतीही वाढ सुचविलेली नाही. (हेही वाचा: महाराष्ट्रात पोलिस भरती मध्ये अजून 7 हजारांची वाढ; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची विधानसभेत घोषणा)
दरम्यान, अशी घटना घडल्यापासून पुढील 48 तासांत नुकसानीची तक्रार अधिकारक्षेत्र असलेले नजीकचे वनरक्षक, वनपाल अगर वन परिक्षेत्र अधिकारी यांचेपैकी कोणाकडेही लेखी स्वरूपात करणे आवश्यक आहे. या प्रकरणाची शहानिशा संबंधित वनपाल करतील. व्यक्ती मृत झाल्यास आर्थिक मदत फक्त कायदेशीर वारसालाच दिली जाते. अर्थ सहायाची रक्कम केवळ रेखांकित धनादेशाद्वारे दिली जाते. सदर व्यक्तीच्या नावे बॅंकेत खाते असणे आवश्यक आहे.