Farmers' Protest Enters 100th Day: शेतकरी आंदोलनास 100 दिवस पूर्ण; राकेश टिकैत म्हणाले 'शेवटच्या श्वासापर्यंत लढू आणि जिंकू'
Farmers' Protest | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्र सरकारने संमत केलेले कृषी कायदे मागे घेतले जावेत या मागणीसाठी राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. या आंदोलनास आज (6 मार्च 2021) 100 दिवस (Farmers' Protest Enters 100th Day) पूर्ण झाले. हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी केएमपी एक्सप्रेस-वे जाम करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, शेतकरी नेते आणि भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टीकैत (Rakesh Tikait) यांनी शेतकऱ्यांचे आभार मानत म्हटले आहे की, हे कायदे रद्द होईपर्यंत किंवा योग्य ते बदल होईपर्यंत हा संघर्ष कायम राहिल. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू आणि जिंकू.

गाजीपूर बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा अशी राकेश टिकैत यांची ओळख आहे. राकेश टीकैत यांनी शनिवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'शेतकरी संघर्षाचा 100 वा दिवस. योग्य मार्ग निघेपर्यंत... शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करु. लढू... जिंकू'. टीकैत यांनी शेतकरी आंदोलनात उतरलेल्या शेतकऱ्यांचेही आभार मानले आहेत. (हेही वाचा, Punjab Municipal Poll Results : पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाचा भाजपला धक्का; स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस अधिक घट्ट)

शेतकरी आंदोलनास 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त शेतकरी कुंडली-मानेसर-पलवल म्हणजेच KMP एक्सप्रेसवे वर 5 तासांसाठी नाकाबंदी करणार आहेत. ही नाकाबंदी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत असणार आहे. शेतकऱ्यांनी म्हटले की, या दिवशी एक्सप्रेसवेवर टोल प्लाझाही मुक्त केला जाईल.

केंद्र सरकारद्वारा लागू करण्या आलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनास आता 100 दिवस पूर्ण झाले आङेत. गेल्या वर्षी 26 नोव्हेंबर पासून हजारोंच्या संख्येने शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमांवर विविध ठिकाणी धरणे प्रदर्शन करत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत अशी या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.