सध्याचे सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांना डावलत आहे, मुद्दाम त्यांच्या गरजा, मागण्या यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे यामुळे सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांमध्ये एकजूट वाढत आहे. खा. राजू शेट्टी यांच्या अथक प्रयत्नातून देशातील शेतकऱयांच्या तब्बल 204 संघटना शेतकऱयांच्या अशा प्रश्नावर एकत्रित आल्या आहेत. यातूनच देशपातळीवर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती उदयास आली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने येत्या 29 व 30 नोव्हेंबर रोजी देशभरातील शेतकरी संसदेवर चालून जाणार आहेत. या आंदोलनात महाराष्ट्रातून लाखो शेतकऱयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले आहे.
या शेतकऱ्यांच्या ‘संपूर्ण कर्जमुक्ती विधेयक 2018’ आणि ‘शेतीमालाला मालाला दीडपट हमीभाव 2018’ या दोन विधेयकांवर तसेच शेतकऱयांच्या प्रश्नांवर चर्चा करून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे या प्रमुख मागण्या आहेत.
खा. राजू शेट्टी यांनी देशभरात दौरे करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांचा कर्जबाजारीपणा, देशभरात शेतकऱयांचे सुरू असलेले आत्महत्येचे सत्र यामागील कारणे व त्यावरील उपाय योजना याचा अभ्यास करून स्वाभिमानीचे नेते खा. राजू शेट्टी यांनी ‘शेतकऱयांची संपूर्ण कर्जमुक्ती विधेयक 2018’ आणि ‘शेतकऱयांना दीडपट हमीभाव 2018’ ही दोन विधेयके तयार करून, लोकसभेत मांडले होते. आता यावर चर्चा करण्यासाठी सरकारने विशेष लक्ष द्यावे अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी देशभरातील शेतकरी संसदेला घेराव घालणार आहेत.
महाराष्ट्रातून दिल्लीला जाण्यासाठी कोल्हापूर येथून एक स्वतंत्र रेल्वे आरक्षित केली आहे. ही ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ 28 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरहून दिल्लीला रवाना होईल.