'सेनेचा मुख्यमंत्री शपथ घेताना स्टेजसमोर बसू द्या', शेतकऱ्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे केली मागणी
उद्धव ठाकरे (Photo Credits-Twitter)

शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावा या साठी सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या पत्नीसह पाच दिवस निरंकार उपवास करत 85 किलोमीटर अनवाणी पायाने पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. याच शेतकऱ्याला आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः भेटायला गेले होते.

संजय सावंत असं त्या शेतकऱ्याचं नाव असून त्याने उद्धव ठाकरे यांना पंढरपूरमधून आणलेली तुळशीची माळ आणि चंद्रभागेमधील तीर्थ भेट दिले.

तसेच टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या वेळी, शेतकरी संजय सावंत यांनी त्यांना विनंती केली की, “शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना स्टेजसमोर मला जवळ उभं करा.”त्यावर उद्धव ठाकरे यांनी, "तुमचा संपर्क क्रमांक द्या, मी तुम्हाला शपथविधी सोहळ्यात स्टेजवर उभं करतो," असं आश्वासन संजय यांना दिलं.

अवकाळी पावसामुळे पीकांचे नुकसान झाल्याने  शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज सातारा-सांगली येथे दौऱ्यावर

दरम्यान शरद पवार यांच्या राज्यभर दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज ओल्या दुष्काळाला सामोरे गेलेल्या काही भागांना भेट दिली. तसेच त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान, "मी पाहणी करण्यासाठी आलो आहे, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. एका भागात जर एवढे नुकसान झाले असेल तर राज्यात किती नुकसान झाले असेल? सातबारा कोरा करण्याचं वचन शिवसेना पूर्ण करणार," असं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिल्याची माहिती टीव्ही 9 ने दिली आहे.