Ishwar Kharate | (Photo Credits-ANI)

एक दोन नव्हे तर, तब्बल 38 वर्षे पाठपूरावा करुनही विज कनेक्शन न मिळाल्याने बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मलकापूर (Malkapur Taluka) तालुक्यातील वडोदा येथील शेतकऱ्याने भर कार्यक्रमात आत्महत्येचा प्रयत्न केला. इश्वर सुपराव खराटे ( Ishwar Kharate )  असे या शेतकऱ्याचे नाव आहे. कृषी विकास परिषद अंतर्गत स्थानिक गोविंद विष्णू महाजन विद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी व कृषी विकास प्रदर्शनी कार्यक्रमात हा प्रकार घडला.

प्राप्त माहितीनुसार, ना. रणजित पाटील (Ranjit Patil) यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटनत शनिवारी झाले. या कार्यक्रमास पालकमंत्री ना. मदन येरावार (Madan Yerawar), विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे स्वागताध्यक्ष ना. चैनसुख संचेती, आ. आकाश फुंडकर, जि.प.अध्यक्षा उमाताई तायडे, भाजपा जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे आदी मंडळी उपस्थित होती. दरम्यान, या कार्यक्रमास इश्वर सुपराव खराटे हा शेतकरीही उपस्थित होता. कार्यक्रम सुरु असतानाच या शेतकऱ्याने पिशवीतून आणलेली विषाची बाटली बाहेर काढली आणि तोंडात टाकली.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी गोंधळ निर्माण झाला. मात्र, बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी या शेतकऱ्याला पकडून कार्यक्रमाबाहेर नेले व उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने भरती केले. दरम्यान, हा शेतकरी विज महामंडळाकडे विज कनेक्शन मिळावे यासाठी गेली 38 वर्षे मागणी करत होता. मात्र, महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे या हे कनेक्शन मिळू शकले नसल्याचा शेतकऱ्याचा दावा आहे. (हेही वाचा, बेरोजगार तरुणाचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न)

एएनआय ट्विट

दरम्यान, हा प्रकार राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मलकापुरात येण्यापूर्वी घडल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, याची पुष्टी होऊ शकली नाही.