Representational Image (Photo Credits: File Image)

मुंबई गुन्हे शाखा युनिट 2 ने एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची तोतयागिरी केल्याप्रकरणी आणि क्रॉफर्ड मार्केटमधील 24 वर्षीय व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक (Fake IPS Officer Arrested) केली आहे. आरोपीविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात 8 जुलै रोजी तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात पुढे आले की, आरोपीने संदीप नारायण गोसावी, संदीप कर्णिक, आणि दिनेश बोडूलाल दीक्षित अशी बनावट नावे वापरली होती.

क्रॉफर्ड मार्केटजवळील साकेबी कलेक्शन या दुकानाचे मालक, तक्रारदार नाझीम कासिम कच्ची यांनी सांगितले की, आरोपीसोबत त्यांची ओळख एक वर्षापूर्वी झाली होती. त्या व्यक्तीने स्वतःची ओळख संदीप कर्णिक अशी करून दिली आणि तो उच्चपदस्थ आयपीएस अधिकारी असल्याचा दावा केला. तो वारंवार दुकानात येत असे आणि जवळच्या मुंबई पोलिस आयुक्तालयातील इतर गणवेशधारी अधिकाऱ्यांनी त्याला ओळखले, ज्यामुळे कच्चीचा विश्वास आणखी वाढला.

दरम्यान, आरोपीने 5 जून रोजी दुकानात येऊन सांगितले की, त्याचा फोन नागपूरमध्ये गाडीत राहिला आहे. त्याने काही वेळासाठी कच्छी यांचा Samsung A35 फोन वापरण्याची विनंती केली. विश्वासाने कच्छी यांनी फोन दिला, मात्र त्यानंतर आरोपीने फोन परत केला नाही. तो प्रतिसाद देणं टाळत होता आणि ₹14,000 देण्याचं आश्वासनही पूर्ण केलं नाही.

कच्छी यांनी चौकशी केल्यानंतर समजले की आरोपी कोणताही पोलिस अधिकारी नसून यापूर्वीही अनेकांची फसवणूक केली आहे. 7 जुलै रोजी रात्री आरोपी पोलीस आयुक्तालयाच्या गेट नं. 5 जवळील आरे सरिता स्टॉल येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावर कच्छी यांनी ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. आरोपीला अटक करण्यात आली आणि गुन्हे शाखा कार्यालयात नेण्यात आले. त्याच्याकडून चोरी केलेला फोन जप्त करण्यात आला.

अंतर्गत चौकशीत आरोपीने एकाहून अधिक नावे आणि बनावट ओळख वापरून सामान्य नागरिकांची फसवणूक केली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून बनावट आधार कार्ड जप्त केले असून त्यावर दिनेश बोडूलाल दीक्षित हे नाव असले तरी फोटो मात्र आरोपीचाच होता. भारतीय दंड संहिता 2023 (BNS) च्या कलम 337 (बनावट दस्तऐवज तयार करणे) अंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपीला एस्प्लेनेड कोर्टात हजर करण्यात आले असून 11 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील इतर सहकारी कोण आहेत, आधार कार्ड बनवले कसे गेले, आणि अजून कोण फसवले गेले आहेत का, याची चौकशी सुरू आहे.