कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनाही मिळणार लोकलची सुविधा; मुख्य सचिव अजोय मेहता यांचे आश्वासन
Representational Image (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणूमुळे राज्यात उद्यागेधंदे, व्यवसाय, वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. मात्र, गेल्या 3 जूनपासून महाराष्ट्रात अनेक नियमांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात आरोग्यसेवा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवासाची (Mumbai Local Trains) सुविधा देण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेत असलेल्या पत्रकारांना (Journalists) अजून ही सुविधा देण्यात आलेली नाही. नुकतीच विधिमंडळ वार्ताहर संघ आणि राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता (Ajoy Mehta) यांच्यात चर्चा झाली आहे. दरम्यान, येत्या आठवड्यापासून पत्रकारांनाही रेल्वेतून प्रवास करता येणार, असे आश्वासन अजोय मेहता यांनी दिले आहे. ज्यामुळे पत्रकारबांधवाना रेल्वेतून प्रवास करता येणार आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्यासह पत्रकारबांधव देखील आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, आरोग्य कर्मचारी व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्यात पत्रकारांना प्रवासाची परवानगी दिलेली नाही. सध्या पत्रकारांना अनेकदा वार्तांकन मुंबई, मुंबई उपनगर आणि अन्य शहरात जावे लागत आहे. त्यामुळे पत्रकारांनाही लोकल रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी वार्ताहर संघाच्यावतीने करण्यात आली आहे. यावर अजोय मेहता म्हणाले की, खाजगी रुग्णालये देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे प्रवाशाची मागणी करीत आहेत. त्यावर विचार करीत आहोत. त्यात पत्रकारांनाही लोकल रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी देण्याचा विचार आहे. येत्या आठवडाभरात त्यावर निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- राष्ट्रवादीच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे राज्यपालनियुक्त आमदार होणार

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. राज्यात काल 2 हजार 786 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर, 178 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 1 लाख 10 हजार 744 वर पोहचली आहे. यापैकी 4 हजार 128 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 56 हजार 49 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सोमवारी दिली आहे.