Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

Thane Gas Cylinder Explodes: ठाण्यात आग विझवताना घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाच्या 3 जवानांसह 4 नागरिक जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. शहरातील वागळे इस्टेट परिसरातील राम नगर रोड क्रमांक 28 येथील स्पेअर पार्ट्सच्या दुकानाला भीषण आग लागली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, अग्निशमन दलाचे जवान आग विझवत असताना एका घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात अग्निशमन दलाचे 3 जवान आणि 4 नागरिक जखमी झाले. त्यानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अग्निशमन दलाचे जवान आग विझवत असताना तेथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी अचानक घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे या स्फोटोत अग्निशमन दलाचे 3 जवान आणि 4 नागरिक जखमी झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा स्फोट इतका भीषण होता की, या स्फोटात जवळच्या 3 ते 4 दुकानांचं मोठ नुकसान झालं. (वाचा -Bhandara Hospital Fire: भंडारा अग्नितांडव प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांचे महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप)

मुंबई शहरातील उपनगरांमध्ये आतापर्यंत आगीच्या किंवा घरगुती सिलिंडरचा स्फोट होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. 4 जानेवारी रोजी नाशिकच्या खुटवडनगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात एका कुटुंबातील तीन जण जखमी झाले होते. तसेच स्फोटानंतर लागलेल्या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या होत्या. याशिवाय आजूबाजूच्या घरांच्या आणि गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. (Bhandara Hospital Fire: 'ह्यांच्या चौकशांना कोणी भीक घालत नाही' म्हणत निलेश राणे यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र)

दरम्यान, शनिवारी पहाटे भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत 10 नवजात शिशूंचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. आगीच्या घटनेतील मृत शिशूंच्या पालकांना पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही ठाकरे यांनी दिले आहेत.