शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) नोटीस बजावली आहे. वर्षा राऊत यांना पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी (PMC Bank scam) हे समन्स बजावण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच त्यांना मंगळवारी (29 डिसेंबर) ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. यासंदर्भात संजय राऊत यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
याआधी महाविकास आघाडीतील काही नेत्यांना ईडीने समन्स बजावले आहे. भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनाही ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावत 30 डिसेंबर रोजी मुंबईतील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. आता त्यांच्याच पत्नीला ईडीची नोटीस आल्याने, संजय राऊत नेमकी कशी भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. हे देखील वाचा- Devendra Fadnavis on CM Uddhav Thackeray: बांधकाम धोरणात सुधारणा करा अन्यथा उच्च न्यायालयात PIL दाखल करेन, देवेंद्र फडवणीस यांचे उद्धव ठाकरे यांना 'या' मुद्द्यावरुन पत्र
एएनआयचे ट्विट-
Enforcement Directorate sends notice to Varsha Raut, wife of Shiv Sena MP Sanjay Raut in connection with PMC Bank Scam. #Maharashtra
— ANI (@ANI) December 27, 2020
एकनाथ खडसे यांना ईडी नोटीस आल्यानंतर संजय राऊत आपली प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, ते म्हणाले होते की, आमच्या शिवसेनेच्या नेत्यांनाही 'ईडी'च्या नोटिसा आल्या आहेत. जे तुमच्या विरोधामध्ये आहेत, तुम्ही ज्यांच्याशी राजकीय सामना करू शकत नाहीत, अशा लोकांना तुम्ही 'ईडी', 'सीबीआय', 'इन्कम टॅक्स' अशा बळाचा वापर करून नमवण्याचा प्रयत्न करीत असाल, तर ते होणार नाही,' असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता.