Nitin Raut On Central Government: वीज क्षेत्राच्या खासगीकरणाचा केंद्राचा डाव हाणून पाडा- नितीन राऊत
Nitin Raut (Photo Credit: ANI)

उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut ) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. वीज क्षेत्राचे (Electricity Department) खासगीकरण करण्याचा डाव केंद्र सरकारने आखला आहे. हा डाव कार्यक्षमतेच्या जोरावर हाणून पाडा, असे अवाहन करत नितीन राऊत यांनी केंद्रावर हल्ला चढवला. राऊत यांच्या हस्ते सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनने पनवेल येथे उभारलेल्या अभियंता भवनचे अभासी पद्धतीने उद्घाटन झाले. या वेळी उर्जामंत्री बोलत होते.

उर्जा विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करत नितीन राऊत म्हणाले की, सर्व अभियंते उत्कृष्ट ग्राहक सेवा देण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. मात्र, केंद्र सरकार या कामात विविध क्लृप्त्या वापर अडथळे आणत आहे. त्यासाठी एकएक युक्ती करत केंद्र सरकार सावकाश पावले टाकत खासगीकरणाच्या दिशेने निघाले आहे. केंद्र सरकारला उर्जा क्षेत्राचे खासगीकरण करायचे आहे. मात्र, सर्व अभियंत्यांनी ग्राहकांना नेहमीच दर्जेदार सेवा देत सर्वोत्तम कार्य कायम ठेवावे आणि केंद्र सरकारचा डाव हाणून पाडावा, असे उर्जामंत्री म्हणाले.

दरम्यान, अभियंता भवन ही इमारत छान उभारली आहे. या इमारतीत अभियंत्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था होईल. याशिवाय विचारांची देवाणघेवाण करण्यासाठीही एक हक्काची जागा उपलब्ध होईल, अशा भावनाही उर्जामंत्र्यांनी या वेळी व्यक्त केल्या. विचारांची ही देवाणघेवाण महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपन्याची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविण्यासाठी सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन पुढाकार घेईल, असा विश्वासही उर्जामंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.