Nana Patole On Allotment of Seats: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूक 2024 आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला असला तरी त्यासोबतच जागावाटपावरूनही पक्षांमध्ये वाद सुरू आहेत. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जागावाटपाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे महाविकास आघाडी (MVA) मध्ये पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या गुणवत्तेच्या आधारे जागावाटप करण्यावर भर देणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांना सांगितले की, काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पराभव करण्याचा निर्धार केला आहे. हे उद्दिष्ट लक्षात घेऊन जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल. त्यांचा पक्ष म्हणजे काँग्रेस महा विकास आघाडी (MVA) हा युतीचा एक घटक आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आणि शिवसेना (UTB) देखील समाविष्ट आहे. (हेही वाचा - AAP Leaders Meet Uddhav Thackeray: अरविंद केजरीवाल, भगवंत मान आणि AAP नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट)
नाना पटोले यांनी पुढे बोलताना सांगितलं की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा केली. महाविकास आघाडी (एमव्हीए) म्हणून एकत्र लढत असल्याने गुणवत्तेनुसार जागा वाटपावर भर दिला जाणार आहे. जागावाटपावर चर्चा करण्यापूर्वी प्रत्येक सीटचा सखोल अभ्यास केला जाईल. MVA भाजपचे एकतर्फी आणि जुलमी सरकार पाडण्यासाठी कटिबद्ध आहे.
नाना पटोले म्हणाले, 2014 आणि 2019 पेक्षा परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेस जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक जागेचा आढावा घेऊन निर्णय घेईल. महाराष्ट्र हे काँग्रेसच्या विचारसरणीचे राज्य आहे. विदर्भातही काँग्रेसचा जनाधार वाढला आहे. गेल्या तीन वर्षात सर्व निवडणुकांमध्ये आपण मोठा विजय मिळवला असून भाजपचा पराभव केला आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन जागा वाटप करण्यात येणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी सांगितले होते की, महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाने (भाजप) जिंकलेल्या लोकसभेच्या जागांवर एमव्हीए भागीदारांमधील जागावाटपाच्या चर्चेदरम्यान सर्वप्रथम चर्चा केली जाईल. शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची युती असलेला MVA पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुका '100 टक्के' एकत्र लढेल.