
देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे झाली, परंतु आजही महाराष्ट्रातील एका गावात असे 540 लोक होते, ज्यांनी आपल्या गावात आता कुठे वीज (Electricity) पहिली आहे. विश्वास ठेवणे अवघड आहे मात्र हे खरे आहे. हे गाव विदर्भाच्या अकोला (Akola) जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील आदिवासी गाव असलेल्या 'नवी तलाई' (Navi Talai) येथील रहिवाशांना गावात वीज आल्याबद्दल इतका आनंद झाला की त्यांनी चक्क दिवाळी साजरी केली. समाजसेवक गोपाळ कोल्हे आणि एमएलसी अमोल मिटकरी यांनी पुढाकार घेऊन या गावाला वीज पुरविली. या विषयावर त्यांनी सतत सरकारवर दबाव आणला आणि वेळोवेळी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
एमएलसी अमोल मिटकरी यांनी आता हे गाव दत्तक घेतले आहे. यापूर्वी हे लोक अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या मुख्य भागात राहत होते आणि 2018 मध्ये त्यांना नवी तलाई येथे हलविण्यात आले. मात्र, पुनर्वसन काळापासून तल्हारा तालुक्यातील गावात राहणारे हे 540 लोक विजेपासून वंचित राहिले. रहिवाशांना मोबाइल फोन चार्ज करण्यासाठी देखील शेजारच्या गावातील लोकांवर अवलंबून रहावे लागत होते. मात्र अखेर 22 जुलै रोजी नवी तलाईत वीज आली आणि इथल्या लोकांच्या घरातील अंधार संपला. (हेही वाचा: शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या माळी, ओबीसी, समाजातील बांधवाच्या पाठीशी खंबीर उभा राहणार - अनिल महाजन)
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘गावाला वीज पुरवण्याची जबाबदारी महावितरणाची आहे. महावितरण मिशन मोडमध्ये काम करते व आता गावातील सर्व घरात वीज पोहोचली आहे.' नवी तलाई गावातील रहिवाशांसाठी हा प्रसंग अकाली दिवाळीसारखा होता. दिवे लावून आणि केक कापून त्यांनी विजेचे स्वागत केले. मिटकरी, ज्यांनी हे गाव दत्तक घेतले आहे ते म्हणाले, आता नवी तलाई गाव राज्यातील विकासाचे उदाहरण म्हणून उदयास येईल.