महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांतील 1,566 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम लवकरच होणार जाहीर, राज्य निवडणूक आयुक्तांनी केली घोषणा
Election Commission of India (PC - Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown)  मार्च 2020 मध्ये होणा-या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांना (Gram Panchayat Election) स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता राज्य निवडणूक आयोगाच्या बैठकीत लवकरच या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी ही घोषणा केली आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1,566 ग्रामपंचायतीसाठी या सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. लवकरच नव्याने या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल अशी माहिती मदान यांनी दिली आहे.

"राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. मात्र, कोरोना संकटामुळे 17 मार्च 2020 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता", अशी माहिती मदान यांनी दिली आहे.हेदेखील वाचा- BMC Election 2022: मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप युती होणार का? विरोधी पक्षनेत्याने दिले हे उत्तर

एप्रिल, मे आणि जूनमध्ये महाराष्ट्रातील 1566 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. या काळात या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणे आवश्यक होते. यातून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता लवकरच आता या निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर होईल. त्यामुळे सर्वांचे या निवडणूकांच्या तारखांकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी विशेष तयारी करण्यात येणार आहे. सोशल डिस्टंसिंग आणि कोरोना संबंधीची सर्व खबरदारी घेत या निवडणुका होणार आहेत.

तर मुंबईतही मुंबई महापालिका निवडणूक 2022 बाबत आतापासूनच विचार करण्यास सुरुवात केली आहे. सर्व राजकीय पक्ष आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत मनसे भाजपसोबत युती करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिका निवडणूक 2022 डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जनता पक्षाने आतापासूनच हालचाल करण्यास सुरुवात केली आहे