महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) नवा झेंड्यात (New Flag) शिवरायांच्या राजमुद्राचा (Shivaji Maharaj Rajmudra) वापर केल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) मनसेला नोटीस (Notice) बजाविली आहे. त्यामुळे मनसेचा बहुचर्चित नवीन झेंडा आता नव्या वादात अडकला आहे. या नोटीसला आता मनसे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही संघटनांनी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार, निवडणूक आयोगाकडून मनसेला ही नोटीस बजावण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या विशेष अधिवेशनात नव्या भूमिकेसह नव्या झेंड्याचे अनावरण केले होते. या भगव्या रंगाच्या झेंड्यात शिवरायांच्या राजमुद्रेच्या समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या विरोधात जय हो फाउंडेशन, संभाजी बिग्रेड आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी ही नोटीस बजाविली आहे. या नोटीसीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा गैरवापर करण्यात आल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा - महाराष्ट्रात शिवसेना-भाजपमध्ये जेवणाच्या थाळीवरून राजकारण; शिवभोजन थाळीनंतर BJP ने सुरु केली 30 रुपयांत 'दीनदयाळ थाळी')
मनसेचा हा नवा झेंडा मोठ्या वादात अडकण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणाविषयी बोलताना मनसेचे शिरीष सावंत यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने पाठविलेली नोटीस अद्याप आम्हांला मिळालेली नाही. राज्य निवडणुक आयोगाला आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठविलेल्या पत्राची प्रत पाठविणार आहोत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याचा विषय हा निवडणूक आयोगाच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे हा विषय जर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अख्तारित येत नसेल तर तो राज्य निवडणुक आयोगाच्या कक्षेतही येणार नाही. तसेच आम्ही सर्व नियमांचे पालन करून नवा झेंड्याचे अनावरण केले आहे, असेही शिरीष सावंत यांनी म्हटलं आहे.