प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षादरम्यान, आता दोन्ही पक्षांत थाळी संघर्ष सुरू झाला आहे. ठाकरे सरकारच्या 10 रुपयांच्या शिवभोजन थाळीनंतर (ShivBhojan Thali), आता भाजपने 'दिनदयाळ थाळी' (Deendayal Thali) सुरु केली आहे. काल, मंगळवारी पंढरपूर येथे या थाळी योजनेला सुरुवात झाली. त्यानंतर आता ही योजना संपूर्ण राज्यभर सुरु करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

जनसंघाचे नेते दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त, भाजपने मंगळवारी 'दीनदयाळ थाळी' योजना सुरू केली. 26 जानेवारी रोजी, शिवसेनेच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने गरिबांसाठी सुरू केलेल्या, 10 रुपयांच्या 'शिवभोजन थाळीच्या तुलनेत भाजपाच्या 30 रुपये किंमतीच्या 'दीनदयाळ थाळी' मध्ये अधिक व्हरायटी असणार आहे.

भाजपाच्या या थाळीमध्ये तीन चपात्या, एक वाटी तांदूळ, दोन भाज्या, शेंगदाणा चटणी आणि आंबा लोणचे आहे. तर, 'शिवभोजन थाळी'मध्ये दोन चपाती, एक भाजी (100 ग्रॅम), 150 ग्रॅम तांदूळ आणि एक वाटी डाळ दिली जात आहे. थाळी योजनेसाठी भाजपाने पक्षाशी संबंधित महिला बचत गटामधील महिला निवडल्या आहेत. 11 फेब्रुवारी रोजी भाजपच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त, 'दीनदयाळ थाळी' पंढरपुरात सुरू झाली. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराजवळ इंदिरा मार्केटमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. (हेही वाचा: शिवभोजन थाळी उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी 11,274 थाळींची विक्री; ठाणे आणि नाशिक मधून मोठा प्रतिसाद)

मंगळवारी या केंद्राचे उद्घाटन भाजपा नेते व माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख व भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी केले. दीनदयाळ थाळीला शासनाचे कोणतेही अनुदान नसून ही थाळी विना अनुदानित स्वरूपाची आहे. दरम्यान, सध्या राज्यात शिवभोजन थाळी प्रचंड लोकप्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या 17 दिवसांच्या काळात राज्यात दोन लाख 33 हजार 738 नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याची माहिती मिळत आहे.