CM Eknath Shinde On Lok Sabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठे विधान केले आहे. तिन्ही पक्ष (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अजित गट) लोकसभा निवडणूक एकत्र लढणार आहेत. ही निवडणूक आम्ही महाआघाडी म्हणून लढवू, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. याशिवाय महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्याचा दावाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
महाआघाडीत भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. दरम्यान, शिंदे गटाचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेच्या सर्व 13 खासदारांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा तिकीट मिळणार आहे. (हेही वाचा - CM Eknath Shinde: 'सगळे काही 'असुर' आणि 'बेसूर' नसतात', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
तथापी, गुरुवारी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की, आम्ही एनडीएसोबत आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. याला पक्षाच्या अन्य नेत्यांनी पाठिंबा दिल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी पक्षांसोबत जागावाटपाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. महाआघाडीचे सरकार स्थिर आहे, सर्व आमदार एकत्र असून मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहे. (हेही वाचा - Ajit Pawar Revealed 3 Secret: सरकारसोबत जा, मी राजीनामा देतो; शरद पवार यांच्यासंदर्भात अजित पवारांनी केले तीन मोठे गौप्यस्फोट)
अजित पवार यांनी शुक्रवारी शरद पवार यांच्याबात तीन मोठे गौप्यस्फोट केले. यात त्यांनी शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावरही भाष्य केलं. तसेच शरद पवार यांनीचं आपल्याला सरकारमध्ये सामील होण्यास सांगितलं असल्याचा खळबळजनक दावा केला.