एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर (Shivsena) आपला हक्क सांगितला. आता आपणच 'खरी' शिवसेना असल्याचा दावा दोघेही, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट करत आहेत. या दोन्ही गटांमध्ये सध्या पक्षाबाबत संघर्ष सुरु आहे. आता माहिती मिळत आहे की, उद्धव ठाकरे गटाने एकूण 8.5 लाख सदस्यत्वाची कागदपत्रे निवडणूक आयोगाला पाठवली आहेत.
सेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, त्यांनी 11 लाख प्राथमिक सदस्यत्व फॉर्म गोळा केले होते परंतु, निवडणूक आयोगाने ही कागदपत्रे सबमिट करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निर्दिष्ट केल्याप्रमाणे साडे आठ लाख कागदपत्रे पाठवली गेली. सध्या खरी शिवसेना कोणाची या प्रकरणाची सुनावणी निवडणूक आयोग करत आहे. याआधी महिन्याच्या सुरुवातीला, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले होते.
देसाई पुढे म्हणाले की, त्यांनी सर्वपक्षीय सदस्य 'प्रतिनिधी सभा' आणि जिल्हाप्रमुखांपासून, बूथ प्रमुखांपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रेही सादर केली आहेत जी साधारण 2.62 लाख आहेत. इतर जिल्ह्यांतील आणखी प्रतिज्ञापत्रेही जोडली जातील, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 40 आमदारांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर सेना सावध झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेत्यांकडून प्रामाणिक प्रतिज्ञापत्रे मागवली. प्रतिज्ञापत्रांवर आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांना सह्या करायच्या होत्या. (हेही वाचा: Diwali Shidha: दिवाळीच्या शिधातून तेल गेलं आणि हाती फक्त नेते मंडळींचं फोटो लावलेलं पॅकेट आलं! राज्य सरकारवर सर्वसामन्यांची नाराजी)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिज्ञापत्रात असे लिहिले आहे की, ‘माझा शिवसेनेच्या घटनेवर पूर्ण विश्वास आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी दिलेल्या विचारांवर आणि तत्त्वांवर माझा पूर्ण विश्वास आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देत आहे. मी खात्री देतो की मी पक्षाच्या घटनेतील उद्देशांचे पालन करण्याचा प्रयत्न करेन.’