एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिसेनेमध्ये जोरदार पडसाद उमटत आहेत. एका बाजुला शिवसेनेतील शिंदे गट विरुद्ध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shiv Sena) असा दुहेरी संघर्ष एकाच पक्षात पाहायला मिळतो आहे. उद्धव ठाकरे प्रचंड सक्रीय झाले असून त्यांनी शिवसेनेमध्ये फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच एकनाथ शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना धक्का मिळाला आहे. तानाजी सावंत यांची सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदारुन हकालपट्टी करण्यात आली आहे. तानाजी सावंत यांना पदावरुन हटविल्यानंतर अनिल कोकीळ यांची सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे.
शिवसेना मुखपत्र अशी ओळख असलेल्या दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध तानाजी सावंत यांना सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख पदावरुन हटवत असल्याचे निवेदन प्रसिद्ध झाले आहे. दरम्यान, शिवसेनेने केलेल्या कारवाईबाबत तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया अद्याप पुढे आली नाही. ते काय प्रतिक्रिया देतात याबाबत उत्सुकता आहे. तानाजी सावंत शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शिवसैनिकांतून जोरदार प्रतिक्रिया आली होती. नाराज शिवसैनिकांनी तानाजी सावत यांच्या पुणे आणि सोलापूर येथील कार्यालयांची तोडफोड करण्यात आली होती. (हेही वाचा, उस्मानाबाद: शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी डावलला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश; शिवसैनिकांचे कारवाईकडे लक्ष)
एका बाजूला शिवसेनेत बदलांचा धकाडा सुरु असताना उद्याचा दिवस (11 जून) शिवसेना आणि राज्याच्या राजकारणासाठीही अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील लोकशाही, घटना आणि कायदे यांसह राजकारणावरही मोठा परिणाम करणारा असा हा दिवस असणार आहे. महाराष्ट्रातील सत्तादरादरम्यान शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या अपत्रतेविषयी याचिका दाखल केली आहे. याशिवाय विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची बाजू मांडणारी याचिकाही न्यायालयात दाखल आहे. शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते यावर बरेच काही अवलंबन असणार आहे. या सुनावणीबाबत उत्सुकता आहे.
दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रतोद (सुनिल प्रभू) आणि शिंदे गटाचे प्रतोद (भरत गोगावले) यांनी परस्पर गटांविरोधात व्हीप जारी केले आहेत. हे व्हीप विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी काढण्यात आले होते. त्यारुन दोन्ही बाजंनी व्हीपचे उल्लंघन केल्याचा आरोप करत वधिमंडळ सचिवालयाकडे तक्रारी केल्या होत्या. यावरुन विधिमंडळ सचिवालयाने दोन्ही गटांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी ७ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी या नोटीस जारी केल्या आहेत. त्यामुळे आता पुढे काय घडते याबाबतही उत्सुकता आहे.