Osmanabad Zilla Parishad Elections Results 2020: महाविकाआघाडी (Maha Vikas Aghadi ) सरकारमध्ये मंत्रिपद न मिळू शकल्याने माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी थेट पक्षविरोधी कारवायाच सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषद ( Osmanabad Zilla Parishad) उपाध्यक्ष निवडणुकीत तानाजी सावंत यांची पक्षविरोधी भूमिका प्रामुख्याने पुढे आली. उस्मानाबाद येथे तानाजी सावंत यांनी आपला गट बाजूला काढत थेट भाजपसोबतच हातमिळवणी केल्याचे पाहायला मिळाले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray) यांनी 'मातोश्री'वरुन थेट तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधला व आपण पक्षविरोधी भूमिका तसेच, महाविकाआघाडी विरोधात भुमिका घेऊ नये असा आदेश दिला. परंतू, तानाजी सावंत यांनी पक्षादेश जुमानला नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकाआघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नसल्याने तानाजी सावंत हे नाराज असल्याचे वृत्त होते. मंत्रिपद न मिळाल्याच्या कारणावरुन तानाजी सावंत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात एका बैठकीत खडाजंगी झाल्याचेही वृत्त होते. अद्याप पर्यंत तरी शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने या वृत्ताचे खंडण केले नाही. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत सावंत यांची ही नाराजी उफाळून आली आणि त्यांनी आपला गट शिवसेना विरोधी कारवाईत सहभागी केला असे चित्र आहे.
तानाजी सावंत यांनी आपला पुतण्या धनंजय सावंत यांना उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या कोट्यातून उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली. एबीपी माझा या वृत्ताहिणीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकाळी सहा वाजता तानाजी सावंत यांना फोन करुन शिवसेना आणि महाविकासआघाडी विरोधात भुमिका घेऊन नये असा आदेश दिला होता. दरम्यान, अनिल देसाई यांनीही तानाजी सावंत यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण, शिवसेना नेतृत्वाचे प्रयत्न फळाला आले नाहीत, सावंत यांनी पक्षादेश पाळलाच नाही.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी राणाजगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उस्मानाबाद जिल्हात मोठा फटका बसला होता. त्यामुळे एकूण 54 सदस्यसंख्या असलेल्या उस्मानाबाद जिल्हा परिषदेत राणाजगजितसिंह पाटील यांचा मोठा गटही भाजपसोबत गेला. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे केवळ 26 पैकी 17 सदस्य राहिले होते. त्याउलट जिल्हा परिषद निवडणुकीत मूळ भाजपकडे केवळ 4 सदस्य होते. त्यामुळे इथे फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात होणार हे नक्की होते. त्यानुसार राणाजगजितसिंह आणि भाजपने इतर पक्षातील सदस्य गळाला लावण्यासाठी प्रयत्न केले.