देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा शपथविधी सोहळा आजच (30 जून) रोजी पार पडण्याची शक्यता आहे. शिवसेना (Shiv Sena) बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज मुंबईत दाखल झाले. विमानतळावर मुंबईत दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात एक बैठक पार पडेल. या बैठकीनंतर दोन्ही नेते संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतील असे सांगितले जात आहे. सर्व माहिती सूत्रांच्या हवाल्याने येते आहे. त्यामुळे त्यात निश्चीती येत नाही. मात्र, फारसा वेळ न दवडता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ आजच घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकनाथ शिंदे गोवा येथून एका विशेष चार्टर्ड विमानाने मुंबई विमानतळावर दाखल झाले. या वेळी विमानतळावर मुबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधानपरिषद आमदार प्रसाद लाड, पराग आळवणी यांच्यासह शिंदे समर्थक आणि भाजप नेते उपस्थित होते. (हेही वाचा, Eknath Khadse On Uddhav Thackeray: शिवसेना गटनेता मला आमदारांनीच केले, उद्धव ठाकरे यांचा राजीनामा वेदनादायी- एकनाथ शिंदे)
एकनाथ शिंदे हे विमानतळावरुन निघाले आहेत. ते राजभवन येथे जाऊन सत्तास्थापनेचा दावा आणि भाजपला पाठिंबा दिल्याचे पत्र सादर करतील. त्यानंतर मलबार हिल परिसरात देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी हे दोन्ही नेत्यांमध्ये भेट होईल. त्यानंतर शपथिवीधीबाबत चर्चा केली जाईल असे सांगितले जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, राजभवनातील दरबार हॉल येथे हा शपथविधी पार पडेल असे सांगितले जात आहे.