
भारतामध्ये उद्या (22 एप्रिल) दिवशी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. मुंबई मध्येही मुस्लिम बांधव ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. प्रवाशांची गर्दी पाहता बेस्ट कडून ईदच्या दिवशी अधिकच्या बस रस्त्यावर उतरल्या जाणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार मुंबई मध्ये रमजान ईदच्या निमित्ताने 165 अधिक बस विविध मार्गांवर चालवल्या जाणार आहेत. प्रामुख्याने या बससेवा मोहम्मद अली रोड, हाजी अली, शिवाजी नगर, अंधेरी, जुहू चौपाटी, मालवणी, जोगेश्वरी, माहीम, धारावी, अॅन्टॉप हिल रोड या भागात चालवल्या जाणार आहेत.
बेस्ट कडून जारी परिपत्रकानुसार, रमजान ईद 22 एप्रिल 2023 दिवशी साजरी होणार असून 23 एप्रिलला बारशी ईद साजरी केली जाणार आहे. विकेंडला आलेला सण आणि त्यामुळे वाढणारी वाहतूक कोंडी पाहता मुंबई मध्ये महत्त्वाच्या भागात बेस्टच्या अधिक फेर्या चालवल्या जाणार आहेत. त्यामध्ये मोहम्मद अली रोडपासून धारावी पर्यंतचा समावेश आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही ईद साठी होणारी अधिकची गर्दी पाहता या अधिकच्या बससेवा चालवल्या जात आहेत. हे देखील नक्की वाचा: BEST Bus Fare Update: बेस्ट कडून बस पास च्या दरामध्ये कपात जाहीर; विद्यार्थी, सिनियर सिटीझन्सना मिळणार असा फायदा!
आज शव्वालच्या चंद्र दर्शनानंतर भारतामध्ये उद्या म्हणजेच 22 एप्रिलला ईद साजरी होणार असल्याची घोषणा झाली आहे. ईदची नमाज अदा करण्यासाठी, प्रियजनांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सोबतच ईद निमित्त खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव घराबाहेर पडतात. त्यामुळे मुंबईच्या अनेक ठिकाणी मोठी गर्दी उसळते. या गर्दीचं नियोजन ट्राफिक विभागासोबतच बेस्ट प्रशासनाकडूनही करण्यात आले आहे.