शिवसेना नेते Arjun Khotkar यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; 78.38 कोटींची मालमत्ता जप्त
Arjun Khotkar | PC: Facebook

सध्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या (Shiv Sena) आमदारांनी केलेल्या बंडामुळे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. या सत्तासंघर्षादरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर कारवाई केली आहे. एजन्सीने खोतकर यांची 78.38 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात जमीन, एक रेसिडेन्शिलय प्लॅन्ट, एक बिल्डिंग आणि स्ट्रक्चर अशी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. कारखान्याच्या जमीनीचा जो व्यवहार झाला आहे त्यामध्ये अनियमितता आढळल्याचा आरोप आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने दोन महिन्यांपूर्वीच साखर कारखान्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी एजन्सीने जालना जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र लिहून कारखान्यावर निर्बंध घालण्याचे आदेश दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याचा वापर विक्री आणि व्यवहारापुरता मर्यादित होता. गेल्या अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे.

रामनगर साखर कारखान्याच्या गैरव्यवहारप्रकरणी अर्जुन खोतकर यांचीही चौकशी सुरू आहे. आज एजन्सीने कारखान्याची जमीन जप्त केली आहे. ईडीने 26 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे PMLA अंतर्गत तपास सुरू केला. 22 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे. (हेही वाचा: मविआ सरकार सत्तेत कायम राहिल, बंडखोर शिवसेना आमदारांना महाराष्ट्रातच यावे लागेल- शरद पवार)

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी देखील ईडीने या कारखान्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अर्जुन खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी दोन दिवस छापेमारी केली होती. आता अचानक झालेल्या या जप्तीच्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. खोतकर सध्याला मुंबईला आहेत. या कारवाईबाबत काही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.