Dilip Dhole

मीरा भाईंदर महापालिका (Mira Bhayandar Municipal Corporation) आयुक्त दिलीप ढोले (Dilip Dhole) यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ED) समन्स बजावलं आहे. कोट्यवधी रुपयांच्या नागरी जमीन कमाल मर्यादा नियमन कायदा घोटाळ्याप्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनी लाँड्रिंगच्या तपासाचा एक भाग म्हणून ईडीने दिलीप ढोले यांना त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावलं आहे. ठाणे पोलिसांनी नोव्हेंबर 2016 मध्ये यूएलसी घोटाळा शोधून काढल्यानंतर याचा तपास सुरु केला होता. (हेही वाचा - 81 Years After Quit India Movement: 'भारत छोडो' चळवळीच्या 81 व्या वर्षपूर्ती दिनी तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात)

दिलीप ढोले यांना अर्बन लँड सीलिंग रेग्युलेशन (यूएलसीआर) कायदा प्रकरणातील एजन्सीच्या चौकशीशी संबंधित माहिती आणि स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावण्यात आलं आहे. ठाणे पोलिसांनी नोव्हेंबर 2016 मध्ये यूएलसी घोटाळा शोधून काढल्यानंतर याचा तपास सुरु केला होता.  ज्यामध्ये अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नागरी जमीन कमाल मर्यादा कायदा (ULCR) कायद्याचे उल्लंघन करुन, लाच देऊन आणि बनावट कागदपत्रांचा वापर करुन अतिरिक्त जमीन सरकारला देण्याचं टाळलं होतं.

ढोले हे पूर्वीच्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव होते. त्यावेळी ते महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबरीचे उपायुक्त दर्जाचे होते. तसेच ते सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास मानले जातात.  ढोलेंना याबाबत विचारल्यावर या घोटाळ्याशी माझा काही ही संबंध नसून, मिरा भाईंदर महानगरपालिकेचा विद्यामान आयुक्त असल्याने त्या घोटाळ्यासंबंधी माहिती मला विचारत असल्याचे ढोले यांनी सांगितलं आहे.